समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी सोमवारी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर तिस-या आघाडीचे सरकार स्थापन करण्यात येईल असे सुतोवाच केले. २०१४ च्या निवडणुकीनंतर कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना आपले सरकार स्थापन करता येणार नाही आणि तिस-या आघाडीलाच बहुमत मिळेल व ती सरकार स्थापन करेल अशी भविष्यवाणी मुलायमसिंग यांनी वर्तवली.
तिस-या आघाडीने सरकार स्थापन केले तर त्याचे नेतृत्व कोण करेल असा सवाल विचारला असता, मुलायमसिंग म्हणाले कि, आम्ही अद्याप आमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित केलेला नाही. याबाबतीतला निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाईल. आम्ही याबाबतीत डाव्या पक्षांसोबतही चर्चा करत आहोत, असंही ते पुढे म्हणाले.
लोकसभा निवडणुक २०१४ च्या पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी लवकरच आपण सीपीएमचे जनरल सेक्रेटरी प्रकाश करात यांचीही भेट घेणार असल्याचंही ते म्हणाले. करात यांनी मला नवी दिल्ली येथील तालकटोरा येथे ३० ऑक्टोबर रोजी होणा-या बैठकीसाठी निमंत्रित केले आहे. मी आणि काही वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहोत, परंतू मी त्यांची नावे सांगू इच्छित नाही, असं यादव पुढे म्हणाले.   
समाजवादी पक्षाची मुख्य लढाई ही नेहमीच भाजपसोबत राहिलेली आहे. समाजवादी पक्षाने नेहमीच जातीयवादी शक्तींच्या विरूध्द लढा देऊन त्यांना कमकुवत केले आहे. आम्ही जातीयवादी शक्तींना कधीच सत्तेत येऊ दिलेले नाही आणि अशांना आम्ही चिरडून टाकू असं ते म्हणाले. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये मते मिळवण्यासाठी या शक्ती जनतेला समाजवादी पक्षाच्या विरोधात भडकवण्याचं काम करत आहेत. मी जनतेला असे आवाहन करतो, कि त्यांनी सत्याच्या बाजूने उभं रहावं आणि अशा वल्गनांना बळी पडू नये, असं इटवा येथील एका सभेत बोलताना मुलायमसिंग म्हणाले. त्यावेळी त्यांचे पुत्र आणि मुख्यमंत्री अखिलेश यादजव हेदेखिल उपस्थित होते.
यावर बोलताना समाजवादी पक्षाचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले कि, तारीख संपलेल्या चॉकलेटप्रमाणे ते ही संकल्पना मांडतात आणि आपल्याला माहित आहे त्यांच्या या घोषणेचं निवडणुकीनंतर काय होतं.