scorecardresearch

Indore Temple Accident News : विहिरीचे छत कोसळून १३ जण मृत्युमुखी, इंदूरच्या बेलेश्वर झुलेलाल महादेव मंदिरात दुर्घटना

Indore temple tragedy मंदिराच्या परिसरात असलेल्या विहिरीचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १० महिलांसह १३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना येथे गुरुवारी घडली.

indor temple acciden
इंदूरच्या बेलेश्वर झुलेलाल महादेव मंदिरात दुर्घटना

वृत्तसंस्था, इंदूर : Indore temple tragedy मंदिराच्या परिसरात असलेल्या विहिरीचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १० महिलांसह १३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना येथे गुरुवारी घडली. बेलेश्वर झुलेलाल महादेव मंदिरात सकाळी झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांना वाचविण्यात यश आले आहे. अद्याप काहीजण अडकल्याची भीती असून रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.

येथील पटेल नगर भागातील बेलेश्वर झुलेलाल महादेव मंदिर हे प्रसिद्ध देवस्थान आहे. गुरुवारी रामनवमी असल्यामुळे पहाटेपासून मंदिरात भाविकांची गर्दी होती. मंदिराच्या परिसरात असलेली जुनी मोठी विहीर छत टाकून बंद करण्यात आली होती. या विहिरीच्या परिसरात हवन होत असल्यामुळे तेथे मोठा जनसमुदाय जमला होता. वजन सहन न झाल्यामुळे हे छत कोसळले आणि २५ ते ३० भाविक विहिरीमध्ये पडले. त्यानंतर उपस्थित नागरिकांसह पोलीस, अग्निशमन दल, राज्य आपत्ती व्यवस्थापन दल आणि शीघ्र कृती दलाने बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत १० महिला आणि एका पुरुषाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. अन्य १९ जणांना बाहेर काढण्यात आले असून यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. विहिरीमध्ये अद्याप काही जण अडकले असल्याची भीती असून रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू असल्याची माहिती इंदूरचे जिल्हाधिकारी डॉ. इलायाराजा टी. यांनी दिली.

‘इंदूरमध्ये घडलेल्या दुर्घटनेने दु:ख झाले. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी बोलून मी परिस्थितीची माहिती घेतली. राज्य सरकारने वेगाने मदत व बचावकार्य सुरू केले आहे. या घटनेतील पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मी प्रार्थना करतो,’ असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही घटनेबाबत दु:ख व्यक्त केले.

पाच लाखांची

मदत : मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या नातलगांनी पाच लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. तसेच जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली.

आंध्रमधील मंदिरात भीषण आग

आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात एका मंदिरात मोठी आग लागली. दुव्वा गावातील वेणुगोपाल स्वामी मंदिरात रामनवमी उत्सवाची सांगता होत असताना ही दुर्घटना घडली. मंदिरातील सर्व भाविक रामनवमीच्या शोभायात्रेसाठी आधीच मंदिराबाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. दुर्घटनेत कुणीही मृत अथवा जखमी झालेले नाही. ‘शॉर्ट सर्किट’मुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 00:03 IST

संबंधित बातम्या