India On Pakistans Nuclear Attack Threat: पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर सध्या अमेरिका दौऱ्यावर असून, त्यांनी अमेरिकेतून भारतावर अणुहल्ला करण्याची धमकी दिली होती. आता भारत सरकारने यावर प्रतिक्रिया दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान केलेल्या विधानाकडे आमचे लक्ष वेधण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अणुधमक्या देणे ही पाकिस्तानची जुनी सवय आहे.
या निवेदनात परराष्ट्र मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, पाकिस्तानच्या अशा बेजबाबदार विधानांवर आंतरराष्ट्रीय समुदाय निष्कर्ष काढू शकतो. पाकिस्तान केवळ प्रादेशिक सुरक्षेसाठीच नाही तर जागतिक सुरक्षेसाठीही धोका आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, हा धोका अणू कमांड आणि नियंत्रणाच्या अखंडतेबद्दलच्या शंकांना देखील बळकटी देतो जिथे लष्कराचे दहशतवादी संघटनांशी संगनमत आहे.
यावेळी भारताने अमेरिकेचे नाव न घेता त्यांनाही आरसा दाखवला. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, “हे खेदजनक आहे की, या टिप्पण्या एका मित्र देशातून करण्यात आल्या आहेत. भारताने आधीच स्पष्ट केले आहे की, आम्ही अणू ब्लॅकमेलला बळी पडणार नाही. आम्ही आमच्या राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत राहू.”
पाकिस्तानची धमकी
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला होता. यानंतरही पाकिस्तानकडून भारताविरोधात गरळ ओकणे सुरूच आहे. आता पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा धमकी दिली आहे. असीम मुनीर अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी म्हटले आहे की, जर पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात आले तर ते अणुयुद्ध करतील. पण ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, भारत आता अणुयुद्धाच्या कोणत्याही धमक्यांना ऐकणार नाही आणि कोणत्याही दहशतवादी घटनेला युद्धाचे कृत्य मानले जाईल.
द प्रिंटच्या वृत्तानुसार, असीम मुनीर अमेरिकेत एका चहापान कार्यक्रमात उपस्थित होते, जिथे त्यांनी भारताला धमकी दिली. असीम मुनीर म्हणाले की, सिंधू जल करार स्थगित करून भारताने २५ कोटी लोकांना उपासमारीच्या धोक्यात आणले आहे. ते म्हणाले की, आम्ही भारत धरण बांधण्याची वाट पाहू आणि जेव्हा ते बांधले जाईल, तेव्हा आम्ही ते १० क्षेपणास्त्रांनी उडवून देऊ.
व्यापारी आणि मानद वाणिज्यदूत अदनान असद यांनी टाम्पा येथे आयोजित केलेल्या ब्लॅक-टाय डिनरमध्ये मुनीर उपस्थितांना म्हणाले की, “आपण एक अणुशक्ती-संपन्न राष्ट्र आहोत. जर आपल्याला वाटले की आपण बुडत आहोत, तर आपण अर्धे जग आपल्यासोबत घेऊन बुडू.”