Three Argentinian Women tortured murderd on Instagram live stream : तीन तरुणींचा छळ आणि खून होत असताना त्याचे सोशल मीडियावर लाईव्ह स्ट्रिमिंग केल्याचा धक्कादायक प्रकार अर्जेंटिनामध्ये समोर आला आहे. या हादरवून सोडणाऱ्या घटनेनंतर या प्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी शनिवारी राजधानी ब्युनोस आयर्स (Buenos Aires) च्या रस्त्यांवर हजारो लोकांनी निदर्शने केली.

या आंदोलनादरम्यान पीडितांच्या नातेवाईकांनी ‘लारा, ब्रेंडा, मारोना’ या पीडितांची नावे आणि त्यांचे फोटो असलेले फलक हातात घेतले होते. त्यांच्याबरोबर मोठ्या संख्येने समर्थक असलेला मोर्चा संसदेकडे गेला.

एका स्त्रीवादी गटाने आयोजित केलेल्या या मोर्चात, आंदोलक ढोल वाजवत सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्या “हा एक नार्को-फेमिनिसाइड (feminicide) होता!” आणि “आमचे जीवन टाकावू नाही!” असे संदेश लिहिलेले बॅनर आंदोलनकर्त्यांनी हातात घेतले होते.

२० वर्षीय चुलत बहिणी असलेल्या मोरेना वेर्दी (Morena Verdi) आणि ब्रेंडा डेल कॅस्टिलो (Brenda del Castillo) आणि १५ वर्षीय लारा गुटिरेझ (Lara Gutierrez) यांचे मृतदेह बुधवारी ब्युनोस आयर्सच्या दक्षिणेकडील उपनगरातील एका घराच्या अंगणात पुरलेल्या अवस्थेत आढळले होते. या तीनही मुली पाच दिवसांपूर्वी बेपत्ता होत्या.

आधिकाऱ्यांनी माहिती दिली की , तपासकर्त्यांना हा गुन्हा ड्रग गँगशी संबधीत असल्याचे म्हटले आहे. हा गुन्हा इन्स्टाग्राम लाईव्ह सुरू असताना करण्यात आला आणि एका खाजगी अकाऊंटच्या ४५ सदस्यांनी तो पाहिला.

नेमकं झालं काय?

तपासकर्त्यांनी सांगितले की पीडिता या एका पार्टीसाठी जात होत्या, तेव्हा इतरांना इशारा देण्यासाठी आणि गँग कोडचे उल्लंघन केल्याची शिक्षा म्हणून त्यांना कथितपणे १९ सप्टेंबर रोजी आमिष दाखवून व्हॅनमध्ये बसवण्यात आले.

ब्युएनोस आयर्स प्रांताचे सेक्युरिटी मंत्री जेवियर अलोन्सो (Javier Alonso) यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान ताब्यात घेतलेल्या एकाने माहिती दिल्यानंतर पोलिसांना व्हिडिओ सापडला.या व्हिडीओमध्ये गँगचा म्होरक्या म्हणताना ऐकू येत आहे की, “माझ्याकडून जे ड्रग्ज चोरतात त्यांची अशी अवस्था होते.”

छळ करणाऱ्यांनी पीडितांची बोटे कापली, नखे उपटली, मारहाण केली आणि त्यांचा श्वास कोंडून ठेवला, असे वृत्त अर्जेंटिनाच्या माध्यमांनी दिले आहे.

इन्स्टाग्रामची मूळ कंपनी असलेल्या मेटाने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर हा सगळा प्रकार लाईव्हस्ट्रीम झाल्याच्या दाव्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

आम्हाला इन्स्टाग्रामवर लाईव्हस्ट्रीम झाल्याचे कोणताही पुरावा मिळाला नाही. या भयंकर गुन्ह्याच्या तपासात आमची टीम कायदा अंमलबजावणी यंत्रणांना सहकार्य करत राहिल, असे प्रवक्त्याने एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.