एपी, स्टॉकहोम
जोल मोकिर, फिलिप अगियॉन आणि पीटर हॉविट यांना सोमवारी अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर झाले. नवीन तंत्रज्ञान, नवनिर्मितीचा आर्थिक वाढीवर परिणाम आणि नवे तंत्रज्ञान कशा पद्धतीने जुन्या तंत्रज्ञानाची जागा घेते, यावरील संशोधनासाठी त्यांना हा सन्मान जाहीर झाला. ‘सर्जनशील विनाश’ (क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन) असे नाव या आर्थिक संकल्पनेला आहे.
मूळचे नेदरलँडचे असणारे मोकिर (वय ७९) हे आर्थिक इतिहासकार आहेत. अमेरिकेच्या ‘नॉर्थवेस्टर्न’ विद्यापीठातून त्यांनी संशोधन केले. ऐतिहासिक संदर्भ वापरून दीर्घकाळ कशा पद्धती चालत आल्या आहेत, यावर त्यांचा अभ्यास आहे. तर, हॉविट (वय ७९) आणि अगियॉन (वय ६९) हे ‘सर्जनशील विनाश’ ही संकल्पना कशी काम करते, याचे स्पष्टीकरण गणिताच्या सहाय्याने करतात. अगियॉन यांनी फ्रान्स येथील ‘कॉलेज दी फ्रान्स’ आणि ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ येथून संशोधन केले आहे. मूळचे कॅनडाचे असलेल्या हॉविट यांनी अमेरिकेतील ‘ब्राउन’ विद्यापीठातून संशोधन केले आहे.
अर्थशास्त्रामध्ये त्यांचे संशोधन परस्परविरोधी पण पूरक दृष्टिकोन देणारे असे आहे. अगियॉन आणि हॉविट यांनी सातत्यपूर्ण विकास कसा होतो, याचा अभ्यास करून १९९२ मध्ये एक लेख लिहिला होता. त्यांनी ‘सर्जनशील विनाश’ संकल्पना स्पष्ट करण्यासाठी एक गणितीय प्रारूप तेव्हा मांडले होते. अगियॉन यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ यांच्या २०१७ मधील निवडणूक प्रचारासाठीचा आर्थिक कार्यक्रम आखण्यासाठी मदत केली होती.
‘आर्थिक वृद्धी गृहित धरता कामा नये, हे नोबेलविजेत्या तीन संशोधकांनी त्यांच्या संशोधनातून दाखवून दिले आहे. साचलेपणाच्या स्थितीत अडकू नये, म्हणून ‘सर्जनशील विनाश’ या संकल्पनेला आपण स्वीकारले पाहिजे,’ असे प्रतिपादन अर्थशास्त्रासाठी नोबेल जाहीर करणाऱ्या समितीचे अध्यक्ष जोन हॅसलर यांनी केले.
गेल्या आठवड्यात वैद्यकीय क्षेत्रासाठीचे, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य आणि शांततेचे नोबेल जाहीर करण्यात आले. या वर्षी १० डिसेंबर रोजी सन्मान समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल.
(हा पुरस्कार मिळेल) असे अनेक जण म्हणत. पण, मी खरेच सांगतो, की मला (नोबेल मिळेल) याची अजिबात कल्पना नव्हती. नोबेल जाहीर झाल्याने खरेच धक्का बसला. – जोल मोकिर, नोबेलविजेते
नोबेल जाहीर झाल्याने आनंद झाला. आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द सापडत नाहीत. पुरस्कारातून मिळणारी रक्कम संशोधनासाठी उभारलेल्या प्रयोगशाळेसाठी वापरीन. – फिलिप अगियॉन, नोबेलविजेते