तीन राफेल लढाऊ विमानांची दुसरी तुकडी आज भारतात दाखल झाली. गुजरातमधील जामनगर एअरबेसवर ही विमानं उतरली. यापूर्वी पंजाबमधील अंबालामध्ये पाच राफेल विमानांची पहिली बॅच दाखल झाली होती. भारताने फ्रान्सकडून एकूण ३६ राफेल विमानं खरेदी केली आहेत. ती टप्प्याटप्प्याने भारतात दाखल होत आहेत. आत्तापर्यंत एकूण आठ विमानं भारतात आली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२९ जुलै रोजी पाच राफेल विमानांचा पहिला जत्था अंबाला एअरबेसवर दाखल झाला होता. अबुधाबीतील अल ढफरा एअरबेसवर एक थांबा घेत ही विमानं भारतात दाखल झाली होती. त्यानंतर १० सप्टेंबर रोजी एका औपचारिक कार्यक्रमात ही विमान भारतीय हवाई दलात दाखल झाली होती.

दरम्यान, हवाई दलाच्या माहितीनुसार आज आलेल्या तीन राफेल विमानांनी मध्ये कुठलाही थांबा घेतला नाही. प्रवासादरम्यान फ्रान्सच्या आणि भारताच्या विमानांद्वारे या विमानांमध्ये इंधन भरण्यात आले. हवाई दलाला प्रत्येक दोन महिन्यांनंतर तीन ते चार राफेल विमानं दिली जाणार आहेत.

जून १९९७ मध्ये रशियाच्या सुखोई-३० या लढाऊ विमानं भारतीय हवाई दलात सामिल झाल्यानंतर २३ वर्षांनंतर राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्यात आली आहेत. या विमानांमुळे भारतीय हवाई दल अधिक आक्रमक होणार असून त्यांची क्षमताही वाढली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three rafale jets arrive at jamnagar airbase in gujarat from france says officials aau
First published on: 04-11-2020 at 21:51 IST