Kerala Bomb Blast Case Marathi News : केरळमधील एर्नाकुलमच्या कलामासेरी येथील ख्रिश्चन धर्मियांच्या प्रार्थनास्थळी सकाळी ९ च्या सुमारास लागोपाठ तीन भीषण स्फोट झाले. या स्फोटांमध्ये एकाचा मृत्यू झाला असून, ३६ हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी एका व्यक्तीने आत्मसमर्पण केलं आहे. त्रिसूर जिल्ह्यातील कोडकारा पोलीस ठाण्यात दुपारी एक व्यक्ती आली आणि तिने पोलिसांना सांगितलं की तिनेच कन्वेन्शन सेंटरमध्ये बॉम्ब ठेवला होता. आरोपीची सध्या चौकशी सुरू आहे. या व्यक्तीचा आणि बॉम्बस्फोटाचा काही संबंध आहे का याबाबत पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, या स्फोटांनंतर संपूर्ण केरळ राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. १४ जिल्ह्यांमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या भागांमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केरळ पोलीस समाजमाध्यमांवरही बारीक लक्ष ठेवून आहेत. स्फोटांबाबत तसेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा पोस्ट शेअर करणाऱ्या, खोटी माहिती शेअर करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

एर्नाकुलममधील कलामासेरी येथे आज (२९ ऑक्टोबर) सकाळी ९ च्या सुमारास स्फोट झाल्याची माहिती देणारा एक फोन पोलिसांना आला. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर एनआयएचं पथकही घटनास्थळी दाखल झालं. एका पाठोपाठ तीन स्फोट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.

हे ही वाचा >> VIDEO : केरळमध्ये प्रार्थनास्थळी एकापाठोपाठ तीन भीषण स्फोट, १ जणाचा मृत्यू, ३६ हून अधिक जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले, “ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेचा अधिक तपास केला जात आहे. मी यासंदर्भात पोलीस महासंचालकांशी चर्चा केली आहे. तपासानंतर अधिक माहिती मिळेल.” तर आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सुट्टीवर गेलेल्या डॉक्टरांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना तातडीनं माघारी बोलावलं आहे. स्फोटात जखमी झालेल्यांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाचे संचालक आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांना जॉर्ज यांनी निर्देश दिले आहेत.