पीटीआय, अमरावती
तिरुपतीस्थित श्री वेंकटेश्वर मंदिरामध्ये प्रसाद म्हणून वाटप केल्या जाणाऱ्या लाडवांच्या नमुन्यामध्ये निम्न दर्जाचे तूप आणि प्राण्यांची चरबी आढळल्याचे तिरुमला तिरुपती देवस्थानमने (टीटीडी) शुक्रवारी सांगितले. मात्र, आमच्या उत्पादनांचे नमुने संबंधित अधिकाऱ्यांनी उचित प्रकारे प्रमाणित केले आहेत असे उत्तर मंदिराला तुपाचा पुरवठा करणाऱ्या फर्मने दिले. तर, या प्रकरणी नायडू राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी केला.

लाडवांच्या निवडलेल्या नमुन्यांमध्ये प्राण्याची चरबी आढळली असे टीटीडीचे कार्यकारी अधिकारी जे श्यामला राव यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. मंदिरामध्ये तुपातील भेसळ ओळखण्यासाठी चाचणी सुविधा नाही आणि त्यासाठी बाहेरील सुविधेचाही वापर केला जात नाही याचा मंदिराला तुपाचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराने फायदा घेतला असा आरोप देवस्थानमने केला आहे. भेसळ चाचणी करणे खर्चिक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रकारे, देवस्थानमने मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या आरोपांनी दुजोरा दिला.

हेही वाचा : इस्रायलच्या हल्ल्यात हेजबोलाचा प्रमुख कमांडर ठार

याचिकेवर बुधवारी सुनावणी

या प्रकरणी वायएसआरसीपीचे नेते सुब्बा रेड्डी यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर बुधवार, २५ सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्याचे उच्च न्यायालयाने मान्य केले आहे. या प्रकरणी सत्याचा तपास करावा अशी मागणी रेड्डी यांनी या याचिकेद्वारे केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्राबाबूंकडे सांगण्यासारखे काही नाही रेड्डी

या प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि वायएसआरसीपीचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला जात असताना, त्यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर टीका केली आहे. नायडू यांच्या सरकारला १०० दिवस पूर्ण झालेले असून त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीही काम नाही, त्यामुळे ते जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी हा मुद्दा उपस्थित करत असल्याचा आरोप रेड्डी यांनी केला. केंद्र सरकारने या वादात उडी घेतली असून, केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी या प्रकरणी आंध्र प्रदेश सरकारकडून अहवाल मागितला आहे.