तृणमूल काँग्रेसने ममता बॅनर्जी यांना पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून घोषित करावे आणि त्यानंतरच विरोधक त्यांना आपला नेता मानतात की नाही हे ठरवले जाईल अशी टीका भाजपातर्फे करण्यात येत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्याची खिल्ली उडवत भाजपाने हे वक्तव्य केलं आहे. भाजपाच्या बंगाल युनिटचे अध्यक्ष सुकांता मजुमदार म्हणाले की, ममतांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार बनवावे. ममता बॅनर्जी बंगालच्या मुख्यमंत्री असतील तर त्यांनी दिल्लीत जाऊन मंत्री आणि पंतप्रधानांची भेट घ्यायची हे ठरले आहे. प्रत्येक मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन राज्याच्या विकासासाठी केंद्रीय मंत्र्यांना भेटतो, असेही मजुमदार म्हणाले.

“जोपर्यंत ममतांचा विरोधी पक्षाचा चेहरा असण्याचा प्रश्न आहे, टीएमसीने त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करावे. त्यानंतर विरोधी पक्ष त्यांना नेता म्हणून स्वीकारतात की नाही हे ठरेल. आमच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचा चेहरा स्थिर आहे आणि तो म्हणजे नरेंद्र मोदी,” असे मजुमदार म्हणाले.

सोमवारी दिल्लीत पोहोचलेल्या ममता बॅनर्जी या गुरुवारपर्यंत राजधानीतच असणार आहेत. बुधवारी त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. यादरम्यान त्या बीएसएफची व्याप्ती वाढवण्याबाबत आणि राज्याच्या विकासाबाबत पंतप्रधान मोदींशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ममता बॅनर्जींना तृणमूल काँग्रेसला राष्ट्रीय पक्ष बनवायचा आहे, असे मजुमदार म्हणाले. यासाठी त्या त्यांच्या नेत्यांना वेगवेगळ्या राज्यात पाठवत आहे. बंगालमधील हिंसाचाराच्या माध्यमातून ममता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या असून आता हा हिंसाचार देशभरात नेऊ इच्छित असल्याचे मजुमदार म्हणाले.

त्रिपुरातील हिंसाचाराचा आरोप करत दिल्लीत तृणमूलच्या निषेधाचीही मजुमदार यांनी खिल्ली उडवली. ममता आंदोलनाच्या सूत्रधार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘ममता बॅनर्जींनीही आपले भ्रष्ट पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांना वाचवण्यासाठी धरणे आंदोलन केले होते. त्या आंदोलनासाठी सीबीआय कार्यालयातही पोहोचल्या होत्या, असे मजुमदार म्हणाले.

त्रिपुरातील तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांवरील कथित हिंसाचाराच्या निषेधार्थ कोलकाता येथील भाजपा मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन केल्याबद्दल मजुमदार यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली. तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी धरणे आंदोलनादरम्यान भाजपाचे पोस्टर फाडल्याचा आरोप त्यांनी केला. तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर भाजपा मुख्यालयात प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांचे फोटो चिकटवल्याचा आरोप आहे. मात्र, नंतर भाजपाने ही छायाचित्रे काढून टाकली.