TMC MLA Abdur Rahim Bakhshi threatens BJP leaders : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसचे आमदार व जिल्हाध्यक्ष अब्दुर रहीम बख्शी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळे संपूर्ण राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला आहे. येथील मालतीपूर विधानसभा मतदारसंघातील इनायतनगरमध्ये तृणमूल काँग्रेसने आयोजित केलेल्या एका रॅलीमध्ये भाषण करताना बख्शी यांनी भाजपाच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपा नेत्यांवर टीका करताना बख्शी यांनी काही धमक्या दिल्या, ज्यावरून आता राज्याचं राजकारण तापलं आहे.
तृणमूल काँग्रेसने आरोप केला आहे की भाजपाशासित राज्यांमध्ये बंगाली मजुरांवर, प्रामुख्याने मुस्लिमांवर बांगलादेशी घुसखोर ठरवून अत्याचार केला जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने बंगाली लोकांवरील कथित अत्याचार आणि बंगाली भाषेचा अपमान होत असल्याचा आरोप करत संपूर्ण राज्यभर आज (रविवार, ७ सप्टेंबर) रॅली आयोजित केल्या होत्या. अशाच एका रॅलीत अब्दुर रहीम बख्शी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
अब्दुर रहीम बख्शी नेमकं काय म्हणाले?
अब्दुर रहीम बख्शी यांनी सिलीगुडीचे भाजपाचे आमदार शंकर घोष यांनी पश्चिम बंगालच्या विधानसभेत केलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला. त्यानंतर कोणाचाही नामोल्लेख टाळत घोष यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले, “भाजपाचा एक आमदार निर्लज्जपणे म्हणतो, बंगालमधील ३० लाख प्रवासी मजूर हे बंगाली नाहीत, ते रोहिंग्या किंवा बांगलादेशी आहेत. कुठल्याही भाजपा नेत्याकडून मी अशी टिप्पणी पुन्हा ऐकली तर मी त्याच्या तोंडात अॅसिड ओतून त्याचा आवाज कायमचा बंद करेन, त्याच्या आवाजाची राख करून टाकेन. लक्षात ठेवा हा बंगाल आहे. आम्ही बंगाली तुम्हाला बोलण्याची संधीच देणार नाही. मी तुमच्या चेहऱ्यावर अॅसिड ओतेन.”
बख्शी यांनी लोकांना आवाहन केलं की त्यांनी भाजपाला निवडणुकीत मतदान करू नये. तसेच त्यांनी लोकांना आवाहन केलं की भाजपाच्या नेत्यांवर बहिष्कार घाला, त्यांचा झेंडा फाडून फेकून द्या. त्यांनी भाजपाच्या नेत्यांवर शारीरिक हल्ले करण्याचा इशारा देखील दिला. ते म्हणाले, “भाजपाशासित राज्यांमध्ये बंगाली लोकांच्या हत्या होत आहेत. परंतु, बंगालमधील भाजपा नेते व त्यांचे समर्थक चिडीचूप आहेत. त्यामुळे या राज्यात आपण भाजपाला सहन करू नये, त्यांना बाहेर फेकून द्या.