TMC MP Kalyan Banerjee loses nearly rs 55 lakh : तृणमूल काँग्रेसचे नेते आणि लोकसभा खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या बँक खात्यातून सायबर गुन्हेगारांनी कथितपणे सुमारे ५५ लाख रुपये पळवल्याची बाब समोर आली आहे. सायबर गुन्हेगारांनी बनावट कागदपत्रांच्या मदतीने त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)च्या खात्याचा एक्सेस मिळवल्याचे सांगितले जात आहे. बॅनर्जी यांनी या फसवणुकीबद्दल ब्रँच मॅनेजरने माहिती दिल्याचे वृत्त आनंदबाझारने दिले आहे.
फसवणूक करणाऱ्यांनी बॅनर्जी यांचा फोटो वापरला आणि त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स बदलून त्यांच्या खात्याचा एक्सेस मिळवला आणि त्यानंतर पैसे हस्तांतरित केले.
मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा बॅनर्जी आसनसोल दक्षिणचे आमदार होते, तेव्हा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विधानसभेच्या शाखेत हे खाते उघडण्यात आले होते.
आमदार म्हणून त्यांना मिळालेले सर्व भत्ते याच खात्यात जमा झाले होते. या खात्यातून काही दिवसांपासून कोणतेही व्यवहार झाले नव्हते, त्यामुळे हे खाते निष्क्रिय झाले होते.
न्यूज१८ ने दिलेल्या वृत्तानुसार फसवणूक करणाऱ्यांनी बॅनर्जी यांच्या खात्याचे KYC डिटेल्स अपडेट करण्यासाठी बनावट पॅन कार्ड आणि आधार कार्ड वापरले. त्यांनी बॅनर्जींच्या खात्याशी जोडलेला नोंदणीकृत मोबाईल नंबर देखील बदलला, ज्यामुळे त्यांना खात्याचा पूर्ण ॲक्सेसन मिळाला.
“जर तुम्ही बँकेत पैसे ठेवले तर ते गुन्हेगार पळवतील आणि पैसे घरी ठेवल्यास ते नरेंद्र मोदी घेऊन जातील,” अशी प्रतिक्रिया बॅनर्जी यांनी दिल्याचे वृत्त आनंदबाजारने दिले आहे. यादरम्यान कोलकात्याच्या सायबर गुन्हे विभागाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
