भाजपाच्या अनेक राष्ट्रीय स्तरावरील नेतेमंडळींनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यासाठी ‘पप्पू’ या शब्दाचा अनेकदा वापर केल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे या शब्दावरून काँग्रेसकडूनही वारंवार भाजपावर टीकास्र सोडलं जातं. आता हा शब्द थेट देशाच्या संसदेमध्ये ऐकायला येऊ लागला असून तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी एका विषयावरील चर्चेदरम्यान लोकसभेमध्ये थेट मोदी सरकारलाच “आता पप्पू कोण आहे?” असा परखड सवाल केला आहे. देशाची आर्थिक स्थिती आणि नागरिकत्वाचा त्याग केलेल्या भारतीयांबाबत चर्चा सुरू असताना मोईत्रांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

“पुरवणी मागण्यांमुळे तिजोरीवर अतिरिक्त भार”

लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, मोईत्रा यांनी मोदी सरकारवर टीका करताना अनेक मुद्द्यांवरून परखड सवाल केले. “लोकसभेत मंजूर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये केंद्र सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त ४.३६ लाख कोटींचा भार पडणार आहे. यामुळे देशाच्या अर्थसंकल्पातील तरतुदी आणि तुटीच्या रकमेपेक्षाही जास्त ही रक्कम होईल”, असं महुआ मोईत्रा लोकसभेत बोलताना म्हणाल्या.

“परकीय गंगाजळीमध्ये ७२ बिलियन डॉलर्सची घट”

“एनएसओच्या आकडेवारीनुसार, औद्योगिक क्षेत्राचं उत्पादन ऑक्टोबर महिन्यात तब्बल ४ टक्क्यांनी घटलं आहे. गेल्या २६ महिन्यांतला हा नीचांकी आकडा आहे. इंडस्ट्रियल प्रोडक्शनच्या निर्देशांकात नोंद होणाऱ्या उत्पादन क्षेत्रासह इतर औद्योगिक क्षेत्रामध्येही नकारात्मक विकासदर नोंद झाला आहे. परकीय गंगाजळीमध्ये अवघ्या वर्षभरात तब्बल ७२ बिलियन डॉलर्सने घट झाली आहे”, असं मोईत्रा लोकसभेतील आपल्या भाषणात म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्या भारतीयांचं काय?

दरम्यान, यावेळी बोलताना मोईत्रा यांनी नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्या भारतीयांच्या संख्येवरून केंद्र सरकारला लक्ष्य केलं. यासाठी त्यांनी केंद्र सरकारनेच दिलेली आकडेवारी प्रमाण मानून त्यावरून सरकारला परखड सवाल केले. “मोदी सरकारच्या गेल्या ९ वर्षांच्या काळात जवळपास १२.५ लाख भारतीयांनी आपल्या नागरिकत्वाचा त्याग केला आहे. हे सक्षम अर्थव्यवस्था आणि कररचनेचं लक्षण आहे का? आता पप्पू कोण आहे?” असा सवाल मोईत्रा यांनी यावेळी केला.