TMC MP Mitali Bagh on Kiren Rijiju : संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (२० ऑगस्ट) लोकसभेत १३० वं घटनादुरूस्ती विधेयक सादर केलं. गंभीर गुन्ह्यांप्रकरणी (पाच वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षेचे गुन्हे) सलग ३० दिवस तुरुंगात असल्यास किंवा पोलिसांच्या ताब्यात असल्यास पंतप्रधानांपासून ते मुख्यमंत्री व मंत्र्यांपर्यंत कोणालाही पदच्युत करण्याची तरतूद या विधयेकात करण्यात आली आहे. शाह यांनी हे विध्येक सादर करताच लोकसभेत मोठा गोंधळ झाला.

विरोधी पक्षांनी या विधेयकास कडाडून विरोध केला. काही खासदारांनी घोषणाबाजी करत तर काहींनी सदर विधेयकाच्या प्रती फाडून अमित शाह यांच्या दिशेने फेकून निषेध नोंदवला. काँग्रेससह विरोधी पक्षांमधील खासदारांनी हे विधेयक असंवैधानिक असल्याची टिप्पणी केली आहे. अशातच तृणमूल काँग्रेसच्या महिला खासदाराने केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि मंत्री रवणीत सिंह बिट्टू यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

लोकसभेत झालेल्या गोंधळानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेचं कामकाज स्थगित केलं होतं. त्यानंतर संसद परिसरात प्रसारमाध्यमांशी बातचीत करताना तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिताली बाग व शताब्दी राय यांनी आरोप केला की “भाजपा खासदार किरेन रिजिजू व रवनीत सिंह बिट्टू यांनी लोकसभेत त्यांच्याशी धक्काबुक्की केली. महिला खासदारांना मारहाण देखील केली.”

खासदार मिताली बाग काय म्हणाल्या?

मिताली बाग म्हणाल्या, “आम्ही विधेयकाचा विरोध करत होतो तेव्हा केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू व किरेन रिजिजू या दोघांनी अचानक माझ्यावर हल्ला केला. त्यांनी मला धक्का दिला. त्यांच्या हल्ल्यात मी जखमी झाले आहे. किरेन रिजिजू यांनी मला मारहाण केली. बिट्टू यांनी देखील मारलं. त्या दोघांनी महिला खासदारांवर हल्ला केला. ही खूप लाजिरवाणी बाब आहे. आम्ही या घटनेचा धिक्कार करतो.”

लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न : प्रियांका गांधी

दरम्यान, केंद्र सरकारने सादर केलेलं विधेयक क्रूर आहे अशी टिप्पणी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी केली आहे. त्या म्हणाल्या, “उद्या हे लोक एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोणताही खटला दाखल करू शकतील. दोष सिद्ध न होता वेगवेगळ्या मार्गांनी त्या मुख्यमंत्र्यांना ३० दिवसांसाठी तुरुंगात डांबून ठेवतील आणि मग ती व्यक्ती मुख्यमंत्रिपदी राहू शकणार नाही. हा सगळा संविधानविरोधी प्रकार आहे. याद्वारे लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न होतोय. हे सगळं खूप दुर्दैवी आहे.”