२०२४ च्या लोकसभा निवडणुकांकरिता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देशातील अन्य विरोधी पक्ष एकत्र आल्याच्या मोठ्या चर्चा रंगत आहेत. मात्र, दुसरीकडे तृणमूल काँग्रेस हे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना विरोधी पक्षाचा चेहरा मानतच नसल्याचं समोर आलं आहे. राहुल गांधी हे पंतप्रधान मोदींना पर्याय ठरू शकतं नाहीत, असं तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे. तर, पंतप्रधान मोदींच्या विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा चेहरा असणार असल्याचं तृणमूलकडून सांगितलं जात आहे. गुरुवारी (१६ सप्टेंबर) कोलकाता येथे झालेल्या टीएमसीच्या अंतर्गत बैठकीत ही भूमिका समोर आली आहे.

देशात भाजपाविरोधात विरोधी पक्ष एकवटण्याची शक्यता वाढत असतानाच टीएमसीकडून येणारी ही भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. टीएमसीचे खासदार सुदीप बंडोपाध्याय म्हणाले की, “आम्ही काँग्रेसला वगळून युती करण्याबद्दल बोलत नाही. परंतु, मी राहुल गांधींना बऱ्याच काळापासून पाहिलं आहे. मोदींना पर्याय ठरावं या दृष्टीने राहुल गांधींनी स्वतःला तयार केलेलं नाही. संपूर्ण देशाला ममता हव्या आहेत. म्हणूनच, आम्ही ममता बॅनर्जींना विरोधी पक्षाचा चेहरा मानून प्रचार करणार आहोत.” याचसोबत, अलिकडेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक यांनीही एका निवेदनाद्वारे काँग्रेस पक्ष कमकुवत असल्याचं म्हटलं होतं.

राहुल गांधींवर नेहमीच आक्षेप?

टीएमसीला नेहमीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींबद्दल आदर आहे. परंतु, जेव्हा जेव्हा राहुल गांधींचा विषय येतो तेव्हा तेव्हा पक्षाच्या नेत्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. त्याचप्रमाणे, ममता बॅनर्जींनी विरोधी पक्षाचा चेहरा व्हावा अशी तृणमूल काँग्रेसची इच्छा आहे. पक्षाच्या नेत्यांनी वारंवार आपल्या या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आतापर्यंत सांगत नेहमीच असं सांगत आल्या आहेत की, त्यांच्यासाठी पदापेक्षा विरोधकांची एकता अधिक महत्त्वाची आहे.

‘२०२४ च्या लोकसभेत काँग्रेस फक्त एक योद्धा?’

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर टीएमसी एका मुद्द्यावर विशेष भर देत आहे. तो म्हणजे, ‘२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हा प्रमुख नेता नव्हे तर एकत्र लढणारा फक्त एक योद्धा असेल.’ हीच भावना बंडोपाध्याय यांनी दिलेल्या निवेदनातही दिसून आली. ‘न्यूज १८’शी बोलताना काँग्रेसचे खासदार प्रदिप भट्टाचार्य म्हणाले की, “२०२४ मध्ये काय होईल हे आता सांगणं फार घाईचं होईल. आतापर्यंत काँग्रेस आणि टीएमसीचे संबंध चांगले राहिले आहेत.” मात्र, राजकीय तज्ञांचा असा विश्वास आहे की, २०२४ पर्यंत या संबंधांमध्ये अनेक चढ -उतार दिसून येतील.