पीटीआय, तिरुवअनंतपुरम
वाग्दत्त वधूकडे अवाच्यासव्वा हुंडय़ाची मागणी करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या आरोपाखाली येथील सरकारी डॉक्टरला पोलिसांनी गुरुवारी अटक केली. सरकारी वैद्यकीय महाविद्यालय पोलिसांनी ही कारवाई केली. हे प्रकरण गंभीर असून कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही असे निवेदन राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांच्या कार्यालयाने प्रसृत केले.
येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या शस्त्रक्रिया विभागाची पदव्युत्तर विद्यार्थिनी डॉ. शहाना हिचा मृतदेह तिच्या फ्लॅटमध्ये मंगळवारी आढळला होता. त्याच महाविद्यालयात ऑर्थोपेडिक विभागाचा पदव्युत्तर विद्यार्थी आर ई रुवैस याच्याशी तिचा विवाह निश्चित झाला होता. मात्र, रुवैसच्या कुटुंबीयांनी प्रचंड हुंडय़ाची मागणी करून विवाह मोडला. त्यामुळे नैराश्य येऊन २६ वर्षीय शहानाने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला.डॉ. शहाना सोमवारी रात्री अति दक्षता विभागात कर्तव्यावर हजर होणार होती. पण ती आली नाही किंवा फोनला उत्तरही दिले नाही. तिचा फ्लॅट आतून बंद होता आणि शहाना बेशुद्धावस्थेत होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तिला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने स्वत:ला भुलीचे इंजेक्शन देऊन आत्महत्या केली. तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये ‘प्रत्येकाला फक्त पैसे हवेत’ असे लिहिले होते.
शहानाच्या आत्महत्यांच्या वृत्ताची दखल घेऊन आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी रुवैसला गुरुवारी सकाळी त्याच्या करुनागपल्ली येथील घरातून ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली तसेच हुंडाप्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घडामोडींनंतर महाविद्यालयाच्या प्राचार्यानी डॉ. रुवैसला निलंबित केल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांच्या कार्यालयाने दिली.
हेही वाचा >>>‘प्रेमविवाहासाठी पालकांची संमती अनिवार्य करा’, भाजपा खासदाराची संसदेत मागणी; म्हणाले, “लिव्ह इन रिलेशनमुळे…”
डॉ. शहानाच्या कुटुंबीयांचा जबाब आणि तिच्या फ्लॅटमधून आढळलेली आत्महत्येची चिठ्ठी लक्षात घेऊन डॉ. रुवैसवर कारवाई करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. यासंबंधी पोलिसांनी पुरावे गोळा केले आहेत, पण रुवैसने अद्याप गुन्हा मान्य केलेला नाही असे पोलिसांनी सांगितले.डॉ. रुवैस हा पदव्युत्तर विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय नेता आहे आणि तो ‘पीजी असोसिएशन’चा अध्यक्ष होता. आता त्याला या पदावरून हटवण्यात आले आहे.
हुंडय़ाचा लोभ जीवावर बेतला
डॉ. शहानाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रुवैसच्या कुटुंबीयांनी हुंडय़ामध्ये सोन्याची (प्रत्येकी साधारण ८ ग्रॅम वजनाची) १५० नाणी, १५ एकर जमीन आणि बीएमडब्लू कारची मागणी केली होती. त्यापैकी सोन्याची ५० नाणी, ५० लाखांची मालमत्ता आणि एक कार देण्याचे शहानाच्या कुटुंबीयांनी मान्य केले होते. मात्र, रुवैसच्या कुटुंबीयांना ते मान्य नव्हते आणि त्यांनी विवाह मोडला. त्यामुळे शहानाला नैराश्य आले होते असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले.