बिहारमध्ये स्थापन करण्यात आलेल्या धर्मनिरपेक्ष महाआघाडीची रविवारी जाहीर सभा होणार असून त्याला काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मात्र या सभेला हजर न राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रविवारी होणाऱ्या स्वाभिमान मेळाव्यासंदर्भात आम्हाला सोनिया गांधी यांच्या दौऱ्याच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक प्राप्त झाले आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चौधरी यांनी सांगितले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी पाटणा येथील ऐतिहासिक गांधी मैदानावर सभा आयोजित केली आहे.
राहुल गांधी सभेला येणार का, असे विचारले असता चौधरी म्हणाले की, राहुल गांधी काही दिवसांनी बिहार दौऱ्यावर येणार असून रोड-शो करणार आहेत.