आजपासून नव्या आर्थिक वर्षाची सुरूवात होत आहे. महागाईच्या झळांसह नव्या आर्थिक वर्षाची सुरूवात झाली असून जनतेच्या खिशावर याचा परिणाम पाहायला मिळणार आहे. कारण राष्ट्रीय महामार्गांवरील टोलच्या शुल्कात आजपासून ६ टक्के वाढ होत आहे. राष्ट्रीय वाहतूक धोरणानुसार राष्ट्रीय महामार्गांवरील टोलमध्ये वाढ करण्यात आली आहे. सध्या केंद्र सरकारने टोलदरात दरवर्षी पाच ते सहा टक्क्यांची वाढ करण्याचे धोरण स्वीकारले आहे. यानुसार प्रत्येक रस्त्याच्या अंतरानुसार टोलची वाढ ठरवण्यात येते. त्यामुळे एकुणच देशभरातील प्रवास महागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या धोरणामुळे मुंबई अहमदाबाद, मुंबई-नाशिक, मुंबई-बेंगळुरू, मुंबई-आग्रा आदी राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करताना सध्याच्या टोल रकमेच्या तुलनेत सहा टक्के रक्कम जास्त द्यावी लागणार आहे. तसंच वांद्रे-वरळी सीलिंकच्या टोलमध्येही १० रूपयांची वाढ झाली असून आता ७० रूपये मोजावे लागणार आहेत. ३१ मार्च, २०२१पर्यंत हे नवे दर कायम राहणार आहेत. सीलिंकवर मासिक पासाचे दर एकेरी प्रवास दराच्या ५० पट राहतील. वारंवार प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी परतीच्या पासचे व दैनिक पासचे दर हे त्या वाहनाच्या एकेरी टोलदराच्या अनुक्रमे दीडपट व पाचपट असतील. परतीचा व दैनिक पास ज्या तारखेस देण्यात आला असेल, त्या दिवशीच्या रात्री १२ वाजेपर्यंतच वैध राहील.

पुणे-सातारा, सोलापूर रस्त्यांवर आजपासून टोलवाढ –
पुणे-सातारा आणि पुणे-सोलापूर या दोन्ही महामार्गावरील टोलच्या दरांमध्ये १ एप्रिलपासून वाढ होणार आहे. दोन्ही रस्त्यांवर वाहनांच्या प्रकारानुसार सरासरी पाच ते वीस रुपयांनी टोल वाढणार आहे. पुणे-सातारा रस्त्याच्या सहा पदरीकरणाचे काम अनेक वर्षे रखडले असतानाही या रस्त्यावर टोलवाढ होत असल्याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे-सातारा मार्गावरील खेडशिवापूर आणि आणेवाडी त्याचप्रमाणे पुणे-सोलापूर रस्त्यावर पाटस आणि सर्डेवाडी या टोलनाक्यांवर आता वाहनधारकांना अतिरिक्त टोल भरावा लागणार आहे. छोटय़ा वाहनांसाठी सुमारे पाच रुपये, तर व्यावसायिक आणि मोठय़ा वाहनांसाठी दहा ते पंचवीस रुपयांपर्यंत टोलची वाढ करण्यात आली आहे. करारानुसार दर तीन वर्षांनी टोलच्या दरांमध्ये वाढ करण्यात येते त्यानुसार ही वाढ असल्याचे सांगण्यात आले.

पुणे-सातारा रस्त्याच्या टोलवाढीबाबच मात्र तीव्र भावना व्यक्त करण्यात येत आहेत. या रस्त्याच्या सहा पदरीकरणाचे अडीच वर्षांचे काम तब्बल साडेसात वर्षांपासून रखडले असतानाही शासनाकडून वेळोवेळी मुदतवाढीच्या पायघडय़ा टाकल्या जात आहेत. त्यातच आता रिलायन्स इन्फास्ट्रक्चर कंपनीला टोलवाढीचे बक्षीस देण्यात आले आहे. यापूर्वी खुद्द केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याबाबत भाष्य केले होते. मात्र, त्यानंतरही ‘रिलायन्स’ला अभय मिळाल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले. देहूरोड ते सातारा या सुमारे १४० किलोमीटर रस्त्याचे हे काम आहे. ते ऑक्टोबर २०१० मध्ये सुरू झाले होते. नियोजनानुसार हे काम मार्च २०१३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. काम संथगतीने होत असल्याचे लक्षात येऊनही कंपनीच्या मागणीखातर वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toll charges increased traveling from all over the country will be expensive
First published on: 01-04-2018 at 09:36 IST