उत्तराखंडमध्ये किलोला २५० रुपयांचा भाव

वृत्तसंस्था, मुंबई/नवी दिल्ली : प्रतिकूल हवामानामुळे उत्पादन घटून बाजारात निर्माण झालेली टोमॅटोची टंचाई असह्य होऊ लागली असून, मुंबईसह देशातील अनेक शहरांत टोमॅटोचे दर १५० पार गेले आहेत. विशेषत: उत्तर भारतात टोमॅटोच्या दरांनी अचानक उसळी घेतली असून, उत्तराखंडमधील काही शहरांत २०० ते २५० रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री होत आहे. मुंबई आणि परिसरातही टोमॅटोला १२० ते १६० रुपये किलो असा भाव आहे.

 तीव्र उन्हाळय़ामुळे टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम होऊन दरवर्षी जून-जुलै महिन्यात त्याचे दर वाढतात. मात्र, यंदा दरांनी अभूतपूर्व उच्चांक गाठला आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवडय़ापर्यंत ३० ते ३५ रुपये किलो दर असलेल्या टोमॅटोचा भाव जूनअखेरीपासून वाढला असून, गेल्या दहा दिवसांत हे दर जवळपास चार पटीने वाढले आहेत. यावर्षी जानेवारी महिन्यापासून टोमॅटोच्या दरांत ४४५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

गतवर्षीपेक्षा अधिक कडक उन्हाळा आणि अचानक झालेला बेमोसमी पाऊस या दोन्ही कारणांमुळे टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे देशभरातील ५०हून अधिक शहरांत टोमॅटोचे दर शंभरीपार पोहोचले आहेत. यातील अनेक शहरे उत्तर भारतातील आहेत. उत्तराखंडमधील गंगोत्री धाम येथे शुक्रवारी २५० रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री होत होती. चेन्नईमध्ये टोमॅटो १००-१३० रुपयांवर पोहोचल्यानंतर तामिळनाडू सरकारने शिधावाटप केंद्रांवर ६० रुपये किलो दराने तो उपलब्ध करून दिला आहे. कर्नाटकातही टोमॅटोला १०१ ते १२१ रुपये इतका दर मिळत आहे.

हॉटेलांतही पदार्थ महागणार?

टोमॅटो महागल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचीही अडचण होऊ लागली आहे. ‘टोमॅटो हा आमच्या पदार्थामध्ये अत्यावश्यक घटक आहे. दरवाढीमुळे सॅण्डविच, बर्गर आदी पाश्चात्य पदार्थामध्ये टोमॅटोचा वापर कमी झाला आहे. मात्र, भारतीय जेवणात त्याला पर्याय नाही. दर असेच चढे राहिल्यास पुढील दहा दिवसांत टोमॅटोचे दर लक्षात घेऊन उपाहारगृहाचे मालक पदार्थाच्या किंमती वाढविण्याबाबत निर्णय घेऊ शकतील,’ असे आहार संघटनेचे अध्यक्ष सुकेश शेट्टी यांनी सांगितले.

भाववाढीचे अर्थ-राजकारण

  • टोमॅटो आणि कांदा ही दोन पिके देशातील सामान्य नागरिकांशी भावनिकदृष्टय़ा जोडलेली आहेत.
  • या दोन जिनसांचा वापर दैनंदिन स्वयंपाकात मोठय़ा प्रमाणात असल्याने त्यांचे भाव वाढल्याची जनमानसांत लगेचच प्रतिक्रिया दिसून येते.
  • या भाववाढीचा अनेक पक्षांना निवडणुकांमध्ये फटका बसल्याचेही याआधी घडले आहे.
  • भाज्यांचे भाव वाढल्यास रिझव्‍‌र्ह बँकेच्या महागाई नियंत्रणात ठेवण्याच्या उपाययोजनांवर परिणाम होतो.

दरांची अचानक उसळी

जूनच्या २४ तारखेपर्यंत देशभरात टोमॅटोचे सरासरी दर २० ते २५ रुपये इतके होते. ते ३० जून रोजी १०० रुपये प्रति किलोवर पोहोचले, असे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाच्या ‘अ‍ॅगमार्कनेट’ या संकेतस्थळावरील नोंदी सांगतात. यामागे सर्वात मोठे कारण घटलेली आवक असल्याचे आढळून आले आहे. जूनच्या शेवटच्या आठवडय़ात देशभरातील बाजारांत ६२८४२ टन टोमॅटोची आवक झाली. ही गेल्या चार वर्षांतील सर्वात कमी आवक होती, असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मॅकडोनाल्ड्सच्या बर्गरमधून गायब

टोमॅटोचे वाढते दर आणि घटता दर्जा यांमुळे मॅकडोनाल्ड्स इंडियाच्या उत्तर आणि पूर्व भारतातील उपाहारगृहांनी बर्गरमध्ये टोमॅटोचा वापर बंद केला आहे. ‘आमच्या गुणात्मक निकषांप्रमाणे टोमॅटोचा दर्जा नसून, त्याचे दरही वाढले आहेत. त्यामुळे तूर्तास आम्ही आमच्या पदार्थामध्ये टोमॅटोचा वापर थांबवला आहे,’ असे कंपनीने म्हटले आहे.