गडचिरोली : शेकडो सुरक्षा जवान आणि नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार असलेला, ‘पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी’चा प्रमुख आणि जहाल नक्षलवादी नेता माडवी हिडमाला (४४) ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या तीन राज्यांच्या सीमेवरील अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यात सुरक्षा दलांनी ही मोठी कारवाई केली. या कारवाईत हिडमाची पत्नी राजे उर्फ राजक्का हिच्यासह सहा नक्षल मारले गेल्याची माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली आहे.

वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा त्रि-सीमा परिसर नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला मानला जातो. या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांचे अनेक गुप्त तळ असल्याची पक्की माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी अत्यंत सुनियोजित पद्धतीने ही मोहीम आखली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास जवानांनी नक्षलवाद्यांच्या तळाला वेढा घातला असता, दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू झाला.

या धुमश्चक्रीत माडवी हिडमा आणि त्याच्या सहकाऱ्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. घटनास्थळावरून किमान सहा नक्षल्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. संपूर्ण परिसरात अद्यापही शोधमोहीम सुरू आहे. हिडमा मारल्या गेल्याने शेवटची घटका मोजत असलेल्या नक्षल चळवळीला हादरा बसला आहे.

कोण होता माडवी हिडमा?

माडवी हिडमा हा नक्षलवादी चळवळीतील सर्वात क्रूर आणि ‘मोस्ट वॉन्टेड’ चेहरा होता. १९८१ मध्ये छत्तीसगडमधील सुकमा (पूर्वती) येथे त्याचा जन्म झाला. अत्यंत कमी वयात तो ‘पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी’च्या एका प्रमुख बटालियनचा म्होरक्या बनला. त्याच्या क्रूर रणनीतीमुळे तो नक्षलवाद्यांच्या ‘केंद्रीय समिती’चा सर्वात तरुण सदस्य बनला. बस्तरच्या आदिवासी भागातून या सर्वोच्च निर्णय प्रक्रियेत पोहोचणारा तो एकमेव नेता होता. त्याच्या डोक्यावर विविध राज्यात ५ कोटींहून अधिक बक्षीस होते.

देश हादरवणाऱ्या हल्ल्यांचा सूत्रधार

हिडमाच्या नेतृत्वाखाली सुरक्षा दलांवर किमान २६ मोठे सशस्त्र हल्ले झाले. यामध्ये २०१० साली छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करून ७६ जवानांची निर्घृण हत्या करण्यात आलेल्या भयंकर हल्ल्याचा समावेश आहे. या हल्ल्याचा तोच मुख्य सूत्रधार होता. इतकेच नव्हे, तर २०१३ मध्ये बस्तरमधील झिरम घाटी येथे काँग्रेस नेत्यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यातही त्याची प्रमुख भूमिका होती.

या हल्ल्यात तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल, महेंद्र कर्मा आणि विद्याचरण शुक्ल यांसारख्या वरिष्ठ नेत्यांसह २७ जण ठार झाले होते. तसेच, २०२१ मध्ये सुकमा-बिजापूर सीमेवर झालेल्या भीषण चकमकीचा कटही हिडमानेच रचला होता, ज्यात २२ जवान शहीद झाले होते. हिडमाच्या मृत्यूमुळे बस्तर, आंध्र आणि तेलंगणा पट्ट्यातील नक्षलवादी चळवळीचा कणाच मोडल्याचे मानले जात असून, हे नक्षलविरोधी मोहिमेतील सर्वात मोठे यश मानले जात आहे.