आपल्या पुरस्कारप्राप्त कादंबरीवर आधारित ‘मिडनाइट्स चिल्ड्रन’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वादग्रस्त लेखक सलमान रश्दी हे येथे बुधवारी दाखल होणार होते. मात्र सांस्कृतिक आणि साहित्यिक वर्तुळातून होणारा तीव्र विरोध लक्षात घेऊन सुरक्षेचे कारण पुढे करत अगदी शेवटच्या क्षणी ही भेट रद्द करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांत रश्दी यांनी दिल्ली, बंगलोर आणि मुंबई या शहरांना भेटी दिल्या होत्या. त्या वेळी त्यांना कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागले नाही. रश्दी हे कोलकाता येथे दिग्दर्शिका दीपा मेहता आणि अभिनेता राहुल बोस यांच्यासह या चित्रपटाच्या प्रमोशनसंबंधीच्या कार्यक्रमात सहभागी होणार होते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ऐन वेळी त्यांनी आपली भेट रद्द केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी म्हटले आहे.
‘बुकर’ पुरस्कार विजेत्या वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांचा विरोध करण्यासाठी त्यांच्या येथील आगमनाच्या वेळी अल्पसंख्याक गटांतील शेकडो लोक विमानतळावर जमा झाले होते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी आपली भेट रद्द केल्याचे पोलिसांनी सांगितल्यावर हे सर्व लोक पांगले गेले.
रश्दींपाठोपाठ चित्रपटाच्या दिग्दर्शिका दीपा मेहताही बुधवारी कोलकाता येथे चित्रपटावरील परिसंवादात सहभागी होण्यासाठी येथे येणार होत्या. कोलकाता बुक फेयरने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र त्यांनीही आपली भेट रद्द केली.
रश्दी यांच्या सुरक्षेसंबंधात पोलीस मुख्यालयातील सहआयुक्त जावेद शमीम यांना विचारले असता, आम्हाला रश्दी यांच्या येथील आगमनाबाबत कोणतीही माहिती पुरविली गेलेली नाही. त्यामुळे आम्हाला त्याबद्दल काहीच माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.
रश्दी यांच्याकडे अधिकृत व्हिसा असताना त्यांना बंदी घालण्याचा प्रकार हा आमचा सांस्कृतिक अपमान असल्याचा दावा असून पश्चिम बंगालसाठी ही शरमेची बाब आहे, असे राष्ट्रीय पुरस्कार विजेते बंगाली चित्रपट दिग्दर्शक रितुपर्णो घोष यांनी म्हटले आहे.
सलमान रश्दी यांच्या एका पुस्तकावर बंदी घालण्यात आली आहे, मात्र विचार आणि उच्चार स्वातंत्र्यावर हा एक प्रकारे घाला घालण्याचा प्रकार आहे. लोकशाही व्यवस्थेत जनतेला विरोध करण्याचा अधिकार असताना त्यांच्या पुस्तकावर घालण्यात आलेली बंदी योग्य नव्हे, त्यांचे पुस्तक उपलब्ध केले गेले पाहिजे, असे यासंबंधात लेखक अमिताव घोष यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवताना म्हटले आहे.