हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात टेम्पो ट्रॅव्हलर बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सात पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. घटनेत गंभीर जखमी असलले्या १० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बंजार उपविभागातील घीयाघीजवळ रविवारी रात्री ही दुर्घटना घडली आहे. मृतांमध्ये आयआयटी वाराणसीच्या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
“कुल्लूमधील बंजार खोऱ्यात पर्यटकांची गाडी खडकावरून खाली दरीत कोसळली. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास झालेल्या या अपघातात सात पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेत १० जण जखमी झाले आहेत. यातील पाच जणांना कुल्लूच्या रुग्णालयात तर इतरांना बंजारमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे”, अशी माहिती पोलीस अधीक्षक गुरुदेव सिंग यांनी ‘एनएनआय’ या वृत्तसंस्थेला दिली आहे. गाडीचे ब्रेक वेळीच न लागल्याने ही दूर्घटना घडली आहे.
या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करताना पंतप्रधानांनी जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, बंजारचे भाजपा आमदार सुरेंद्र शौरी यांनी फेसबुक लाईव्हद्वारे या घटनेची माहिती दिली होती. या दुर्घटनेतील पीडित राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीचे रहिवासी आहेत.