TTP Threat To Asim Munir: अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ने पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांना उघड धमकी दिली आहे. टीटीपीने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांच्या एका वरिष्ठ कमांडरने मुनीर यांना पाकिस्तानी सैन्याला मरण्यासाठी न पाठवता स्वतः युद्धभूमीवर येण्याचे आव्हान दिले आहे.
टीटीपीच्या कमांडरने म्हटले की, “असीम मुनीर, जर तुम्ही पुरुष असाल तर असहाय्य पाकिस्तानी सैन्याच्या सैनिकांना युद्धभूमीवर पाठवण्याऐवजी तुम्ही स्वतः कोहटला यावे.” कोहट हा परिसर पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात आहे, जो अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेल्या टीटीपीचा बालेकिल्ला आहे. या भागात टीटीपी अतिरेक्यांचे वर्चस्व आहे.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या व्हिडिओमधील टीटीपी कमांडरचे नाव काझिम असे आहे. हा कमांडर याच व्हिडिओमध्ये असीम मुनीर यांना उद्देशून म्हणाला, “जर तुम्ही पुरुष असाल आणि आईचे दूध प्यायले असेल तर आमच्याशी लढा.”
या व्हिडिओमध्ये ८ ऑक्टोबर रोजी खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कुर्रम भागात झालेल्या हल्ल्याचे फुटेज देखील दाखवण्यात आले आहे. टीटीपीचा दावा आहे की, या हल्ल्यात २२ पाकिस्तानी सैनिक मारले गेले होते. याचबरोबर पाकिस्तानी सैन्याची शस्त्रास्त्रे हस्तगत करण्यात आली होती.
यापूर्वी, २१ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी काझिमला पकडण्यासाठी माहिती देणाऱ्यांना १० कोटी पाकिस्तानी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. याआधी, टीटीपीवरून पाकिस्तानी आणि तालिबानी सैन्यात झालेल्या भीषण युद्धात ५० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याचा तालिबानचा दावा आहे.
काही दिवसांपूर्वी बीबीसी अफगाणचे पत्रकार दाऊद जुनबिश यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, “तालिबानच्या हल्लानंतर ड्युरंड रेषेजवळील चौक्या सोडून पळालेल्या पाकिस्तानी सैनिकांच्या पँट तालिबान सैन्याने आणून त्या अफगाणिस्तानातील पूर्व नांगराहार प्रांतात झळकावल्या आहेत.” यावेळी त्यांनी तालिबानी सैनिकांचा पाकिस्तानी सैनिकांच्या पँट आणि शस्त्रे दाखवतानाचा एक फोटो शेअर केला होता.
या महिन्यात तालिबान-पाकिस्तान यांच्यात झालेल्या गोळीबार आणि हवाई हल्ल्यांमध्ये दोन्हीकडील नागरिकांचे बळी गेले आहेत. गेल्या आठवड्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तालिबानच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांनी कतार व तुर्कीच्या मध्यस्थीने तात्काळ शस्त्रविरामास सहमती दर्शवली होती.