Tv Anchor Death ४० वर्षीय न्यूज अँकर स्वेच्छा वोर्तकारचा मृतदेह तिच्याच घरात आढळून आला आहे. स्वेच्छाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही टीव्ही अँकर तेलगू चॅनलसाठी काम करत होती. स्वेच्छा व्ही या नावाने ती बातम्या देत होती. तिचा मृतदेह पोलिसांना शुक्रवारी गळफास लावलेल्या अवस्थेतच तिच्याच घरात आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हैदराबादमध्ये ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने या अँकरच्या घरी पोहचले होते.
स्वेच्छाची मुलगी घरी आल्यावर काय घडलं?
स्वेच्छाची मुलगी शाळेतून घरी परतल्यानंतर तिने आईच्या बेडरूमचा दरवाजा वाजवला. मात्र आतून प्रतिसाद न मिळाल्याने तिने शेजाऱ्यांना बोलावले. शेजाऱ्यांनी दरवाजा जबरदस्तीने उघडला असता, स्वेच्छा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्या. तात्काळ रुग्णवाहिका बोलावण्यात आली. मात्र वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तिला मृत घोषित केलं. स्थानिक पोलीस या घटनेनंतर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्वेच्छाच्या निधनामुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
के.टी. रामाराव यांनीही व्यक्त केला शोक
बीआरएसचे अध्यक्ष के. टी. रामाराव यांनी स्वेच्छाच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे. स्वेच्छा या टीव्ही अँकरचा मृत्यू ही धक्कादायक आणि तेवढीच वेदना देणारी बाब आहे. माझ्या सहवेदना तिच्या कुटुंबासह आहेत. व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मी तिच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे असं त्यांनी म्हटलं आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
स्वेच्छाच्या वडिलांचा दावा काय?
स्वेच्छाच्या वडिलांनी असा आरोप केला आहे की, त्यांच्या मुलीने तिच्या वैयक्तिक नातेसंबंधातील तणावामुळे आत्महत्या केली. त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या चार वर्षांपासून स्वेच्छा एका जोडीदारासोबत राहत होती. मात्र तिच्या पालकांनी त्या नात्याला संमती दिलेली नव्हती.स्वेच्छाचे वडील शंकर म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या दोघांमध्ये दुरावा वाढत असल्याचे जाणवत होते. एकदा मी तिला विचारले की मी तिच्या जोडीदाराशी बोलू का? तेव्हा तिने स्पष्ट सांगितले होते की मी असं केलं तर ती स्वतःचं जीवन संपवेल. मृत्यूच्या काही वेळ आधीच स्वेच्छाने त्यांना फोन करून सांगितले होते की ती त्या जोडीदारापासून वेगळी झाली आहे.