Army soldier arrested for spying for Pakistan : हेरगिरी केल्याच्या आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) संबंध असल्याच्या आरोपाखाली अमृतसर पोलिसांनी दोन व्यक्तींना अटक केली आहे, ज्यापैकी एक जण लष्करातील जवान असल्याची माहिती समोर आली आहे.
पहलगाम येथे झालेले दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावाचे बनले आहेत, यादरम्यान या दोघांना अटक करण्यात आली आहे. सध्या पंजाब पोलिसांनी संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्यांविरोधात जोरदार मोहिम सुरू केली आहे.
दोन्ही आरोपींची ओळख पटली असून गुरप्रीत सिंग उर्फ गोपी फौजी आणि साहिल मसीह उर्फ शाली अशी दोघांची नावे आहेत. अमृतसर (ग्रामीण) एसपी मनिंदर सिंग यांनी सांगितले की, गुरप्रित सिंग हा २०१६ पासून भारतीय सैन्यात नोकरी करत असून त्याला अटक करण्यात आली तेव्हा तो जम्मू येथे तैनात होता.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, तो आयएसआय अधिकाऱ्यांच्या थेट संपर्कात होता आणि भारतीय लष्करासंबंधी संवेदनशील माहिती यूएसबी ड्राइव्हच्या मदतीने तो पाकिस्तानला पाठवत होता.
एसएसपी सिंग यांनी पुष्टी केली की गुरुप्रीत याचा आयएसआय हँडलर राणा जावेद याच्याशी थेट संपर्क होता. राणा जावेद हा पाकिस्तानच्या बाजूने मुख्य कॉर्डिनेटर होता. आयएसआय ऑपरेटिव्ह बरोबर संपर्क साधण्यासाठी दोन्ही आरोपींनी वापरलेले फोन जप्त करण्यात आले आहेत. फॉरेन्सिक तपासणी आणि या उपकरणांच्या डिजिटल विश्लेषणातून हेरगिरीचे संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे.
तपास यंत्रणा आता या हेरगिरीचे जाळे कुठपर्यंत पसरले आहे याचा तपास करत आहेत. याबरोबरच या दोघांचे इतर नागरिकांशी किंवा आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटांशी संबंध होते का? याचा देखील शोध घेतला जात आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यासारख्या गंभीर घटना किंवा भारत-पाक सीमेवरील तणाव वाढलेला असताना या आरोपींनी नेमकी कोणती गुप्त माहिती शेअर केली याचा अधिकारी तपासणी करत आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरप्रीतला पहलगाम हल्ल्याची पूर्व कल्पना असू शकते आणि त्याने हल्लेखोरांना कोणती माहिती दिली असेल याचा तपास यंत्रणांकडून केला जात आहे.