भारतीय जनता पक्षाकडून दिल्लीत भाजपा अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर प्रहार केला. काँग्रेस पक्ष भ्रष्टाचाराची जननी आहे, असं त्यांनी म्हटलं. तसंच, काँग्रेसनेच लष्करी मनोबलाचं खच्चीकरण केलं असंही मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, अजून निवडणुका लागल्या नाहीत. पण मला जगभरातून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याची आमंत्रणे आली आहेत. याचा अर्थ जगभरातील विभिन्न देशांनाही भाजपा सरकारवर विश्वास आहे. जगातील प्रत्येक शक्तीला माहित आहे की येणार तर मोदीच.

“देशाला काँग्रेसपासून वाचवणं, देशातील प्रत्येक नागरिकाला वाचवणं, आपल्या लहान मुलांचं-तरुणांचं भविष्य वाचवणं हे भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं दायित्त्व आहे”, असंही मोदी म्हणाले. ते पुढे म्हणाले, “काँग्रेसचं टेप रेकॉर्ड आपल्याकडे आहे. काँग्रेस अस्थिरताची जननी आहे, काँग्रेस घराणेशाहीची जननी आहे. काँग्रेस भ्रष्टाचाराची जननी आहे. काँग्रेस तुष्टीकरणाचीही जननी आहे.”

हेही वाचा >> “भाजपाला तिसऱ्यांदा सत्तेत यायचं आहे कारण…”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाजपाच्या अधिवेशनात वक्तव्य

“७० च्या दशकात देशात जेव्हा काँग्रेसविरोधातील वातावरण तयार झालं, तेव्हा स्वतःला वाचवण्यासाठी अस्थिरता निर्माण केली गेली. प्रत्येक नेत्याचं सरकार काँग्रेसने अस्थिर केलं. आजही हे लोक अस्थितरता निर्माण करण्यासाठी षडयंत्र रचत आहेत. त्यांनी निर्माण केलेल्या (इंडिया) आघाडीचीही हीच ओळख आहे. काँग्रेसकडे विकासाचा अजेंडा नाही, भविष्याचा रोडमॅप नाही. भाषा आणि क्षेत्राच्या आधारावर काँग्रेस देशाचं विभाजन करत आहे”,अशीही टीका नरेंद्र मोदींनी केली.

काँग्रेसने लष्करावरही आरोप केले

“काँग्रेसचं सर्वांत मोठं पाप देशाच्या लष्कराचं मनोबल तोडण्यासही ते मागे राहिले नाहीत. देशाची राष्ट्रीय सुरक्षा आणि सामरिक शक्तीला नुकसान पोहोचण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. देशाच्या सुरक्षेवर जेव्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले, आपल्या लष्कराने जेव्हा कोणतं यश संपादन केलं, तेव्हा प्रत्येकवेळी काँग्रेसने त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले. तुम्ही फक्त विचार करा की पाच वर्षांपूर्वी काय म्हटलं होतं की, या लोकांनी रायफेलसारखे एअराक्राप्ट न मिळण्यासाठी प्रयत्न केले. सर्जिकल स्ट्राईकवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. एअर स्ट्राईकच्या वेळी त्यांच्या यशस्वीतेचे प्रमाणपत्र मागितले गेले. काँग्रेस प्रचंड गोंधळलेली आहे”, असंही मोदी म्हणाले.

हेही वाचा >> “नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील आणि घराणेशाही मूळापासून संपवतील”, अमित शाह यांचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदींविरोधात काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद

“काँग्रेसमध्ये वाद सुरू आहेत, मोठा वाद सुरू आहे. योजनांसाठी हा वाद नाहीय. काँग्रेसमध्ये एक वर्ग आहे जो म्हणतो मोदींवर तिखट आरोप करा, व्यक्तिगत आरोप करा. त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी प्रयत्न करा. तर दुसरा वर्गात काँग्रेसचे मूळ परंपरांगत लोक आहेत. ते म्हणतात की काँग्रेसमधील मोदीविरोध बाहेर काढा. यामुळे काँग्रेसला सर्वाधिक फायदा होईल. म्हणजेच, काँग्रेस सैद्धांतिक मुद्द्यावर लढत नाही. काँग्रेस एवढी हताश आहे की त्यांच्यात सैद्धांतिक आणि वैचारिक विरोध करण्यासाठी त्यांच्यात साहस नाही. त्यामुळे शिव्या आणि खोटे आरोप करणे हाच एकमेव त्यांचा अजेंडा आहे”, असंही मोदी म्हणाले.