पाकिस्तानच्या लष्करातील दोन हिंदू अधिकार्‍यांना प्रथमच लेफ्टनंट कर्नल पदावर बढती देण्यात आली आहे, असे वृत्त पाकिस्तानच्या अधिकृत मीडियाने दिले आहे.  मुस्लिमबहुल पाकिस्तानच्या या निर्णयाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. मेजर डॉ. केलाश कुमार आणि मेजर डॉ. अनिल कुमार अशी या दोन अधिकाऱ्यांची नावं आहेत. पाकिस्तान आर्मी प्रमोशन बोर्डाने त्यांच्या पदोन्नतीला मान्यता दिल्यानंतर मेजर डॉ. कैलाश कुमार आणि मेजर डॉ. अनिल कुमार यांना लेफ्टनंट कर्नल पदावर बढती देण्यात आली आहे, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यातील रहिवासी असलेले कैलाश कुमार हे २०१९ मध्ये हिंदू समुदायातील देशातील पहिले मेजर बनले होते. त्यांचा जन्म १९८१ मध्ये झाला होता. जामशोरो येथील लियाकत युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल हेल्थ अँड सायन्सेसमधून एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर २००८ मध्ये ते पाकिस्तानी लष्करात कॅप्टन म्हणून सामील झाले होते.

अनिल कुमार कैलाश पेक्षा एक वर्षाने लहान आहे. ते सिंध प्रांतातील बदीनचे रहिवासी आहेत. २००७ मध्ये ते पाकिस्तानी लष्करात सामील झाले होते, असे वृत्तात म्हटले आहे. गुरुवारी सरकारी पाकिस्तान टेलिव्हिजनने कैलाश कुमारच्या प्रमोशनबद्दल ट्वीट केले. “कुमार हे लेफ्टनंट कर्नल म्हणून बढती मिळालेले पहिले हिंदू अधिकारी ठरले आहेत,” असे पीटीव्हीने ट्वीट केले आहे.

पाकिस्तानातील हिंदू समाजाच्या हक्कांसाठी प्रचार करणारे कपिल देव यांनी ही या बातमीची पुष्टी केली आहे. “कैलाश कुमार यांनी इतिहास रचला असून ते पाकिस्तानी सैन्यात लेफ्टनंट कर्नल म्हणून बढती मिळालेले पहिले हिंदू अधिकारी ठरले आहेत,” असे ट्वीट देव यांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आतापर्यंत या दोन्ही पदोन्नतींबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायातील लोकांना २००० पर्यंत पाकिस्तानी सैन्यात सामील होण्याची परवानगी नव्हती. पाकिस्तानमध्ये हिंदू हा सर्वात मोठा अल्पसंख्याक समुदाय आहे. पाकिस्तानमध्ये अंदाजे सुमारे ७५ लाख हिंदू राहतात.