Singer Chinmayi Sripada On Diwali Fire Accident In Edmonton City Canada: कॅनडातील एडमंटन येथे लागलेल्या आगीत दोन घरांचे मोठे नुकसान झाले असून यात दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. एडमंटन शहर अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, दिवाळीच्या फटाक्यांमुळे ही आग लागली. या घटनांमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. अशात, गायिका चिन्मयी श्रीपदाने ज्या व्यक्तीचे फटाक्यांमुळे घर जळाले आहे, त्याला तेथील भारतीयांनी एकत्र येऊन पुन्हा घर बांधून दिले पाहिजे, असे म्हटले आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये चिन्मयी श्रीपदाने ही भावना व्यक्त केली आहे.

दिवाळी साजरी करा पण…

दिवाळीच्या फटाक्यांच्या आतषबाजीत आपले घर गमावलेल्या व्यक्तीने सीटीव्ही न्यूजशी बोलताना म्हटले की, “फटाक्यांचा आवाज खूप मोठा होता. माझी मुलगी तिच्या खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली की अंगणात काहीतरी चमकत आहे. मी बाहेर पाहिले तर ती आग असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यानंतर आम्ही सर्वजण घराबाहेर पडलो आणि ९११ वर कॉल केला.”

तो पुढे म्हणाला की आग वेगाने पसरली. यामध्ये त्याची कार आणि गॅरेज जळून खाक झाले आणि घराच्या छताला छिद्रे पडली. “घराचा मागचा भाग मोठ्या प्रमाणात जळाला आहे”, असे या व्यक्तीने सांगितले.

अशा घटना टाळण्यासाठी या व्यक्तीने प्रशासनाला फटाक्यांविरोधात कठोर उपाययोजना करण्याचे आवाहन केले. तो म्हणाला की, “सध्या फटाक्यांविरोधात एक हजार डॉलर्सचा दंड आहे. तो पाच हजार किंवा दहा हजार डॉलर्स असावा.”

हा पीडित व्यक्ती पुढे म्हणाला की, “माझे घर गेले आहे. तुमच्या सुट्ट्या, दिवाळी साजरे करणे ठीक आहे, पण यामध्ये आमचे घर जळू नये.”

काय म्हणाली चिन्मयी श्रीपदा?

गायिका चिन्मयी श्रीपदाने या व्यक्तीच्या प्रतिक्रियेवर एक्सवर एका ओळीची टिप्पणी करताना म्हटले की, “तेथील भारतीयांनी पीडित व्यक्तीला पुन्हा घर बांधून दिले पाहिजे.”

तीन व्यक्तींविरोधात गुन्हा

एडमंटन पोलिसांनी नागरिकांना दिवाळी सुरक्षितपणे साजरी करण्याचे आवाहन केले आहे. याचबरोबर, परवानगीशिवाय शहराच्या हद्दीत कोणालाही फटाके वाजवता येणार नाहीत.

“परवानगी नसेल तर फटाके वाजवता येणार नाहीत. तुमचे घर प्रकाशाने उजळवा, तुमच्या शेजाऱ्याच्या घराचे छत नव्हे. दिवाळी सुरक्षितपणे साजरी करा”, असे पोलिसांनी म्हटले आहे. २५ अव्हेन्यू आणि २४ स्ट्रीटजवळील घरांना लागलेल्या आगीनंतर तीन जणांवर जाळपोळ केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.