वृत्तसंस्था, मॉस्को, भूवनेश्वर : ओदिशामधील एका हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून पर्यटनासाठी आलेल्या रशियातील एका लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाला आहे. पावेल अँटोव्ह हे पुतिन यांचे टीकाकार असल्यामुळे त्यांच्या अपघाताभोवती गूढतेचे वलय निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच त्यांच्यासोबत आलेल्या आणखी एका पर्यटक नेत्याचा मृत्यू झाल्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. दरम्यान, या दोन्ही आकस्मिक मृत्यूंची राज्य गुन्हे अन्वषण विभाग म्हणजेच सीआयडीमार्फत चौकशी केली जाईल, असे ओडिशाचे पोलीस महासंचालक सुनीलकुमार बन्सल यांनी मंगळवारी  पत्रकारांना सांगितले.

आपला ६५वा वाढदिवस साजरा करण्यासाठी रशियातील सर्वात मोठे सॉसेज उत्पादक आणि असेम्ब्लीमध्ये ‘व्लादिमिर’ भागाचे प्रतिनिधित्व करणारे पावेल रायगड भागात आले होते. २५ डिसेंबर रोजी येथील हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्यानंतर त्यांना स्थानिक मार्गदर्शकाने तातडीने रुग्णालयात हलविले. मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी, सोमवारी त्यांच्या पार्थिवावर कुटुंबीयांच्या परवानगीने अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक विवेकानंद शर्मा यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अँटोव्ह हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे टीकाकार होते. स्वत: प्रथितयश उद्योजक आणि दानशूर अशी ख्याती असलेले अँटोव्ह यांनी जूनमध्ये युक्रेनवरील रशियाचा हल्ला म्हणजे अतिरेकी कृत्य असल्याचे मत  व्यक्त केले होते. त्यावर झालेल्या टीकेनंतर  त्यांनी  विधान मागे घेतले होते.  विशेष म्हणजे  २२ तारखेला त्यांच्यासोबत आलेले आणखी एक नेते व्लादिमिर बुडानोव्ह (६१) यांचा याच हॉटेलमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने  मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार बुडानोव्ह यांच्या मृत्यूनंतर अँटोव्ह तणावात होते.