श्रीनगर : जम्मू- काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या एका पाकिस्तानी दहशतवाद्यासह दोन दहशतवादी मारले गेले.  दक्षिण काश्मीरच्या कुलगाममधील मिऱ्हामा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी हा भाग वेढून तेथे शोधमोहीम सुरू केली. या वेळी लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला असता, सुरक्षा दलांनी त्याचे चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत २ दहशतवादी ठार झाले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

 मारल्या गेलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक पाकिस्तानी नागरिक होता व तो जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संलग्न होता, असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी ट्विटरवर लिहिले.