हे ऐकलंत का?; साडी-धोतरात बांधल्यानं नोटा होतात खराब: सरकारी अधिकारी

दोन हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा खराब होण्याचे प्रमाण वाढले

संग्रहित छायाचित्र
नोटबंदीनंतर चलनात आलेल्या नवीन नोटा या अवघ्या दोन वर्षांमध्ये वापरण्या योग्य राहिलेल्या नाहीत. ‘अमर उजाला’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार नोटबंदीआधीच्या नोटांसाठी वापरण्यात येणाऱ्या कागदासारखा नवीन नोटांसाठी वापरण्यात येणाऱ्या कागदाचा दर्जा उच्च प्रतिचा नसल्याने नोटा खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र दुसरीकडे या नोटा खराब होण्यामागे कपड्यात नोटा बांधून ठेवण्याची भारतीयांची सवय जबाबदार असल्याचे मत अर्थमंत्रालयातील अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार नोटबंदीनंतर लगेचच चलनात आलेल्या दोन हजार आणि ५०० रुपयांच्या नोटांबरोबर वर्षभरापूर्वी चलनात आलेल्या नवीन दहा रुपयांच्या नोटांही एका वर्षात खराब झाल्या आहेत. बँकांनी अशा खराब झालेल्या नोटांचे वर्गिकरण सुरु केले असून या नोटा ‘न वापरता येणाऱ्या’ म्हणून बाजूला काढण्यात येत आहेत. अशाप्रकारे नोटा खराब झाल्यास त्या एटीएममध्ये वापरता येत नाहीत. कारण एटीएममधील सेन्सर्स या खराब झालेल्या वाईट नोटा ओळखू शकत नाहीत.

मात्र सरकारने हे वृत्त फेटाळून लावले असून नवीन नोटांच्या दर्ज चांगला असून त्यासंदर्भात कोणतीही तडजोड करण्यात आली नसल्याचे सांगितले आहे. बनावट नोटा चलनात येऊ नये म्हणून चलनात आणलेल्या नवीन नोटांमध्ये अनेक फिचर्स असल्याचेही सांगण्यात आले आहे. नवीन नोटा कमी कालावधीमध्ये खराब होत असणाऱ्या मुख्य कारण भारतीय लोक त्या योग्य पद्धतीने हाताळत नाहीत. अनेकजण नोटा आपल्या साडीमध्ये किंवा धोतरामध्ये बांधून ठेवत असल्याने त्या लवकर खराब होतात असे मत अर्थमंत्रालयातील बँकिंग क्षेत्राशीसंबंधित एका अधिकाऱ्याने ‘अमर उजाला’शी बोलताना व्यक्त केले आहे.

ज्यावेळेस एखादी नोट एटीएम मशीनमध्ये स्वीकारली जात नाही किंवा ती चलनात वापरणे शक्य नसते त्यावेळी अशा नोटा बँकाकडून ‘न वापरता येणारे चलन’ म्हणून बाजूला काढल्या जातात. बँका अशा नोटा खराब असल्याने, फाटलेल्या असल्याने वापरा योग्य नाही असे सांगून रिझर्व्ह बँककेकडे पाठवतात. या नोटा रिझर्व्ह बँक चलनातून काढून टाकते. नवीन नोटा चलनात आल्या त्यावेळी आरबीआयने या नोटा बँकांना ‘न वापरता येणारे चलन’ म्हणून वेगळ्या काढता येणार नाही असे सांगितले होते. मात्र दिवसोंदिवस खराब नवीन नोटांच्या वाढत्या संख्येमुळे बँकांकडून हा नियम बदलण्याची वारंवार होणारी मागणी लक्षात घेऊन आरबीआयने २०१८ जुलैपासून नवीन नोटा बाजूला काढण्याची मूभा बँकांना दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tying a currency with saree or dhoti makes it unusable says government official