Udaipur Files Movie कन्हैय्या लाल हत्याकांडावर आधारित उदयपूर फाईल्स चित्रपटासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी घेतली जाणार आहे. हा चित्रपट ११ जुलै रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणली जावी म्हणून एक याचिका दाखल करण्यात आली होती. ज्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती लावण्यात आली. ११ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. आता बुधवारी या संदर्भात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
मोहम्मद जावेदने दाखल केली याचिका
कन्हैय्या लाल प्रकरणातील आठवा आरोपी मोहम्मद जावेदने त्याच्या वकिलातर्फे या चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्यासाठी याचिका दाखल केली. प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये. त्याचा या प्रकरणावर परिणाम होऊ शकतो असं जावेदने याचिकेत म्हटलं आहे. ज्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने या चित्रपटाला तात्पुरती स्थगिती दिली होती. तर दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फायरफॉक्स प्रायव्हेट लिमिटेडने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. Live Law ने हे वृत्त दिलं आहे.
उदयपूर फाईल्स हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित
उदयपूरचा टेलर कन्हैया लाल याची २०२२ मध्ये हत्या झाली. उदयपूर फाईल्स याच घटनेवर आधारित आहे. शुक्रवारी म्हणजेच ११ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र आता या चित्रपटावर दिल्ली उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. जमीयत उलेमा ए हिंद आणि इतर याचिकाकर्त्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यासाठी याचिका दाखल केली होती. कन्हैया लाल हत्याकांड प्रकरणातील आरोपी मोहम्मद जावेद याने हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित होईल असं वाटलं होतं. मात्र तसं घडलं नाही.
नेमकं प्रकरण काय?
उदयपूरमध्ये टेलरिंगचं (शिवणकाम) काम करणाऱ्या कन्हैयालाल यांची जून २०२२ मध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती. नुपूर शर्मा हिने मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. कन्हैयालाल यांनी या वक्तव्याचं समर्थन करणारी पोस्ट समाजमाध्यमांवर शेअर केली होती. त्यामुळे मोहम्मद रियाज व मोहम्मद गौस या दोघांनी मिळून कन्हैयालाल यांची हत्या केली. या हत्या प्रकरणात इतरही काहीजण सहभागी असल्याचा दावा केला जात आहे. ‘उदयपूर फाइल्स’ चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्यात यावं यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका करणारा जावेदही या हत्या प्रकरणातील एक आरोपी आहे.