Kerala : देशभरात अनेक ठिकाणी धार्मिक तणावाच्या घटना घडल्याचं पाहायला मिळतं. विशेषतः हिंदू आणि मुस्लिम समुदायामध्ये दंगली घडल्याच्या बातम्या समोर येतात. मात्र, दक्षिण भारतातील केरळ राज्यात एक अनोखी परंपरा पाहायला मिळत आहे. केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील उदयवरम (Udyavaram) गावात हिंदू देवता मशिदीत जाऊन मुस्लिमांना उत्सवाचं आमंत्रण देत असल्याची परंपरा पाहायला मिळते.
उदयवरम गावात हिंदू आणि मुस्लिम समुदाय एकमेकांना आदर देत धार्मिक सौहार्द जपतात. दरम्यान, हिंदू आणि मुस्लिम धार्मिक सौहार्दाचे प्रतीक म्हणून या गावाकडे पाहिलं जातं. ८०० वर्षांपेक्षा जास्त काळापासून ही परंपरा सुरु असल्याचं सांगितलं जातं. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे. उदयवरा अरसु मंजिश्नार क्षेत्र या ठिकाणी दरवर्षी जत्रोत्सव (देवांचा उत्सव) भरत असतो.
या जत्रोत्सवात परंपरेचा एक भाग म्हणून श्री आरासु मंदिरातील देवतांना औपचारिकरित्या तेथील मशिदीत नेले जाते. जेणेकरून मुस्लिम समुदाय देखील या उत्सवात सहभागी होईल आणि या उत्सवाचं औपचारिकपणे आमंत्रित केलं जाईल. ही प्रथा अद्यापही सुरु असल्याची माहिती सांगितली जाते. या उत्सवाकडे धार्मिक एकतेचे उदाहरण म्हणून पाहिलं जातं.
या वर्षी उत्सवाची औपचारिकपणे आमंत्रण देण्यासाठी देवता उदयवर क्षेत्राच्या भंडारा घरातून निघून दुपारी १:३० वाजता मशिदीत पोहोचल्या. मशिदीच्या प्रशासकांनी आणि नुकत्याच शुक्रवारची नमाज पूर्ण केलेल्या मुस्लिम भाविकांच्या मोठ्या जमावाने त्यांचं स्वागत केलं. परंपरेनुसार मुस्लिम समुदायाने देवतांचे श्रद्धेने स्वागत केलं.
८ ते ११ मे या दरम्यान होणाऱ्या देवता महोत्सवासाठी औपचारिकपणे आमंत्रण देण्यात आलं. उत्सवाच्या दिवशी मंदिराच्या परिसरात विशेष आसन व्यवस्था केली जाते. तसेच मंदिरातील देवतांनी आशीर्वादित केलेले फूल मुस्लिम उपस्थितांना सद्भावनेचे प्रतीक म्हणून वाटलं जातं. हा सर्वसमावेश उत्सव हिंदू आणि मुस्लिम समुदायांना एकत्र आणतो.