राहुल गांधींनी लालकृष्ण आडवाणींची काळजी करू नये स्वतःच्या पक्षातल्या नालायक माणसांकडे बघावे त्यांच्याविरोधात काय कारवाई करणार ते सांगावे असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने दिलेला जाहीरनामाही देशासाठी घातक असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. प्रियंका गांधी आणि राहुल गांधी हे देशातल्या जनतेला खोटी आश्वासनं देत असल्याचीही टीका उद्धव ठाकरेंनी केली. यवतमाळमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदू धर्म आणि परंपरा यांचं महत्त्व सांगतात. मात्र आडवाणींना मोदींनी जोडे मारून हाकललं अशी टीका राहुल गांधी यांनी केली. त्यावर उद्धव ठाकरेंनी त्यांना खरमरीत उत्तर दिलं आहे. इतकंच नाही तर शेतकऱ्यांवर गोळ्या चालवणाऱ्या तुमच्या काँग्रेस नेत्यांना तुम्ही जाब का विचारत नाही असेही उद्धव ठाकरेंनी विचारले आहे.

काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत ते गुरु शिष्य परंपरा पाळत नसल्याचं म्हटलं होतं. तसंच लालकृष्ण आडवाणींना जोडे मारून हाकलण्यात आल्याचाही आरोप राहुल गांधींनी केला होता. त्याच टीकेला आता उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. तुमचं सरकार असताना शेतकऱ्यांना नक्षलवादी ठरवून त्यांच्यावर गोळ्या चालवण्याचा आदेश कसा काय दिला होतात? आधी स्वतःच्या पक्षात किती नालायक माणसं आहेत ते बघा त्यानंतर आमच्याबद्दल बोला असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. यवतमाळच्या सभेत त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरही कडाडून टीका केली.