कीव्ह : युक्रेनने शनिवारी संध्याकाळी आपल्या आग्नेय भागातील रशियाव्याप्त मेलिटोपोल या मोक्याच्या शहरावर हल्ला केला, अशी माहिती युक्रेनने हद्दपार केलेल्या रशियासमर्थक युक्रेनियन अधिकाऱ्यांनी दिली. या अधिकाऱ्यांनी सांगितले, की या क्षेपणास्त्र हल्ल्यात दोन जण ठार आणि दहा जखमी झाले आहेत. येथील रशियासमर्थक महापौरांनी सांगितले, की यात अनेक हल्लेखोरही मारले गेले.

या हल्ल्याविषयी व त्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या तपशिलाची स्वतंत्रपणे शहानिशा करता आली नसल्याचे ‘रॉयटर’ वृत्तसंस्थेने स्पष्ट केले. युक्रेनच्या लष्कराकडून तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आदल्या दिवशी, युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या केंद्रीय कमांडने सांगितले, की ते मेलिटोपोलवर हल्ले करणार आहेत.

रशियाव्याप्त झापोरिझ्झिया प्रांतातील रशिया नियुक्त प्रांतपाल येवगेनी बालितस्की यांनी ‘टेलिग्राम’ संदेशाद्वारे सांगितले, की हवाई संरक्षण यंत्रणेने दोन क्षेपणास्त्रे नष्ट केली. चार क्षेपणास्त्रांनी मात्र त्यांचे लक्ष्य गाठले. युक्रेनच्या या क्षेपणास्त्र हल्ल्यात एक मनोरंजन केंद्र उद्ध्वस्त झाले. तेथे नागरिक जेवत होते. महापौर इव्हान फेडोरोव्ह यांनी ‘टेलिग्राम’ संदेशाद्वारे सांगितले, की एका चर्चवरही हल्ला झाला. हे ठिकाण रशियनांनी एकत्रीकरण स्थळात रूपांतरित केले आहे. आणखी एक अधिकारी व्लादिमीर रोगोव्ह यांनी या हल्ल्यामुळे मनोरंजन केंद्राला लागलेल्या आगीची चित्रफीत प्रसृत केली. ही क्षेपणास्त्रे ही ‘एचआयएमएआर’ म्हणून ओळखली जातात. या युद्धातील युक्रेनची ही प्रभावी ‘मल्टिपल रॉकेट लाँचर’ यंत्रणा आहे. त्यांनी रशियन चौक्यांसह शेकडो लक्ष्यांवर अचूक हल्ला केला आहे. युक्रेनचे हवाई संरक्षण मजबूत करण्यासाठी युक्रेनला अधिक मदत पाठवत असल्याची माहिती अमेरिकेने शुक्रवारी दिली होती.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी सांगितले, की  युक्रेनने दोनेत्स्क व मेलिटोपोलवर डागलेल्या पाच क्षेपणास्त्रांना गेल्या २४ तासांत निष्प्रभ करण्यात आले.

रसद, मार्गक्रमणेसाठी महत्त्वाचे शहर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांचे सल्लागार ओलेक्सी अरेस्टोव्हिच यांनी समाजमाध्यमांत दिलेल्या मुलाखतीच्या चित्रफितीत सांगितले, की मार्चपासून रशियाच्या ताब्यात असलेले प्रमुख औद्योगिक व दळणवळण केंद्र असलेले मेलिटोपोल हे देशाच्या दक्षिणेकडील संरक्षणाच्या दृष्टीने मोक्याचे शहर आहे. खेरसन प्रदेशाच्या पूर्वेकडे रशियन सैन्याला पुरवली जाणारी सर्व रसद व मारियोपोलजवळील रशियन सीमेपर्यंतचे सर्व मार्ग मेलिटोपोलवरून जातात. जर हे शहर युक्रेनच्या ताब्यात आले, तर खेरसन प्रांताकडे जाणारी समस्त रशियन लष्कराचे मार्ग व रसद विस्कळीत होईल. तसेच युक्रेन लष्कराला क्रिमियाला जाण्याचा थेट मार्ग उपलब्ध होईल.