scorecardresearch

Ukraine War: रशियासंदर्भातील भारताच्या भूमिकेवर बायडेन नाराज; म्हणाले, “भारताची भूमिका थोडी…”

भारताने आता रशियाकडून तेल विकत घेण्याचा निर्णय घेतल्याने बायडेन यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय.

India Russia USA
बायडेन यांनी उघडपणे व्यक्त केली नाराजी (फाइल फोटो)

युक्रेनमध्ये मागील २७ दिवसांपासून सुरु असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारताच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केलीय. बायडेन यांनी भारत हा अमेरिकेसोबत चांगले संबंध असणाऱ्या मात्र अमेरिकी धोरणांना आधारुन निर्णय न घेणाऱ्या अपवादात्मक मित्रराष्ट्रांपैकी एक असल्याचं म्हटलं आहे. भारताने आता रशियाकडून तेल विकत घेण्याचा निर्णय घेतल्याने बायडेन यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय. युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियावर निर्बंध लागू करुन पाश्चिमात्य देशांनी रशियाची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र यासंदर्भात भारत काही प्रमाणात अस्थिर दिसून येतोय, असं बायडेन यांनी म्हटलंय.

“क्वाड देशांच्या समुहांपैकी जपान आणि ऑस्ट्रेलियाने व्लादिमीर पुतिन यांच्या आक्रमक भूमिकेविरोधात कठोर पावलं उचलली आहे. मात्र भारत याला अपवाद आहे. यासंदर्भात भारताची भूमिका थोडी डळमळीत झाल्यासारखी दिसतेय,” असं बायडेन म्हणाले. अमेरिकेमधील उद्योजकांच्या बैठकीला संबोधित करताना बायडेन यांनी हे वक्तव्य केलं. भारताची रशियासंदर्भातील भूमिका ही थोडी डळमळीत झाल्यासारखी दिसतेय असं सांगतानाच बायडेन यांनी नाटो यापूर्वी कधीच एवढं शक्तीशाली आणि एकी दाखवणारं नव्हतं जेवढं आज आहे, असंही म्हटलंय.

युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियाच्या विरोधात अमेरिकेबरोबरच अनेक पाश्चिमात्य देशांनी निर्बंध लादले आहेत. अनेक कंपन्यांनी रशियामधील आपला व्यवसाय बंद केलाय. यामध्ये खाद्य, वाहन कंपन्यांचा प्रामुख्याने सहभाग आहे. युरोपियन महासंघाबरोबरच संयुक्त राष्ट्रांनीही रशियावर निर्बंध लादले आहेत. रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्याच्या भूमिकेविरोधात संयुक्त राष्ट्रांमध्ये मतदानही झालं. मात्र भारताने संयुक्त राष्ट्रांच्या मतदानाच्या वेळीही अनुपस्थित राहत तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारली.

व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात एकत्र यावं असं आवाहन बायडेन यांनी केलं होतं. यामध्ये नाटो देश, युरोपियन महासंघ आणि अमेरिकेच्या मित्र देशांचा समावेश होता. यासाठी बायडेन यांनी या देशांचं कौतुकही केलं होतं. मात्र असं असतानाच क्वाड देशांच्या समुहामधील सदस्य असणाऱ्या भारताने रशियाकडून तेल विकत घेण्याचा निर्णय घेतलाय. तसेच संयुक्त राष्ट्रांमध्येही भारताने थेट रशियाविरोधात भूमिका घेण्याऐवजी तटस्थ राहण्याला प्राधान्य दिल्याने बायडेन यांनी भारतावर निशाणा साधलाय.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ukraine war us president joe biden says india has been somewhat shaky in stand against russia scsg