रशियाने युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्ध सहाव्या दिवशीही सुरुच आहे. युक्रेनची राजधानी किव्ह आणि खार्कीव्ह या पूर्वेकडील प्रमुख शहरांवर ताबा मिळवण्यासाठी रशियन लष्कराकडून प्रयत्न सुरु आहेत. २४ फेब्रुवारी रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली. त्यानंतर सुरू झालेल्या या संघर्षात आतापर्यंत अनेक जणांना जीव गमावाला लागला आहे. यामध्ये दोन्ही देशातील सैनिकांसह अनेक निष्पाप नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, आज युद्धाच्या सहाव्या दिवशी रशियाने खार्कीव्हच्या मुख्य सरकारी इमारतीवर मिसाईलने हल्ला केला. तसेच अनेक ठिकाणी रशियन सैन्याने गोळीबार केला. या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल आहे. या हल्ल्यावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“रशियाने खार्किव्ह शहरातील मध्यवर्ती चौकात मिसाईलने हल्ला केला. शहरात अनेक ठिकाणी बॉम्ब हल्ला आणि गोळीबार केला. हे गंभीर दहशतवादी कृत्य आहे. या हल्ल्यानंतर रशियाला कोणीही माफ करणार नाही आणि कोणीही हा हल्ला विसरणार नाही,” असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले. तर, युरोपीयन संसदेत भाषण देताना झेलेन्स्की म्हणाले की, “आम्ही आमच्या भूमीसाठी आणि आमच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत. आमची सर्व शहरे आता ब्लॉक झाली आहेत. आम्हाला कोणीही तोडू शकत नाही. आम्ही मजबूत आहोत, आम्ही युक्रेनियन आहोत.”
खार्कीव्हवर क्षेपणास्त्र हल्ला –
राजधानी किव्हनंतर सर्वात महत्वाचं शहर असणाऱ्या खार्कीव्हच्या मुख्य सरकारी इमारतीवर रशियाने बॉम्ब फेकलाय. हा सर्व प्रकार कॅमेरामध्ये कैद झालाय. शहरातील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या अगदी प्रवेशद्वारावर क्षेपणास्त्र पडलं.
“आई…मला फाशी….”; युक्रेनमध्ये लढणाऱ्या रशियन सैनिकानं आईला पाठवलेला शेवटचा मेसेज व्हायरल
दरम्यान, सोमवारी युक्रेनने संयुक्त राष्ट्रांसमोर आपली बाजू मांडताना पुतिन यांच्या नेतृत्वाखाली युक्रेनवर युद्ध लादणाऱ्या रशियावर गंभीर आरोप केलेत. आम्ही नागरी वस्तीवर हल्ले करत नसल्याचा दावा करणाऱ्या रशियाकडून रुग्णालये, अनाथाश्रमांवर बॉम्बहल्ले केले जात असल्याचा दावा युक्रेननं केलाय.