वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशी झालेल्या चर्चेत आपण त्यांच्या समोर दहा सूत्री शांतता प्रस्ताव मांडल्याची माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी बुधवारी दिली. अमेरिकन काँग्रेसला संबोधताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी विश्वास व्यक्त केला, की यामुळे भविष्यात अनेक वर्षे सुरक्षेची उभयपक्षी हमी मिळेल.

अमेरिका दौऱ्यावर आलेल्या झेलेन्स्की यांनी बुधवारी ‘ओव्हल’ कार्यालयात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी बायडेन यांच्यासह ‘व्हाईट हाऊस’मध्ये पत्रकार परिषद घेतली. फेब्रुवारीत रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर झेलेन्स्की यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. रशियन आक्रमणास ३०० दिवस पूर्ण होत असताना झेलेन्स्की यांचे अमेरिकेत आगमन झाले आहे. झेलेन्स्की यांनी बुधवारी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनास संबोधित केले. ते म्हणाले, की आम्हाला शांतता हवी आहे. युक्रेनने आधीही अनेक प्रस्ताव दिले आहेत. याबाबत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याशी मी नुकतीच चर्चा केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमच्या सुरक्षेची हमी देण्यासाठी आमच्याकडे शांतता प्रस्तावाची दशसूत्री आहे. आगामी काळात आमच्या सुरक्षेच्या हमीसाठी या प्रस्तावाची अंमलबजावणी अत्यंत गरजेची आहे. मात्र हे सर्वस्वी रशियाच्या वाटाघाटी करण्याच्या इच्छेवर व आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त व्यवस्थेच्या मध्यस्थीवर अवलंबून असेल.  रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर टीका करताना झेलेन्स्की म्हणाले, की एक दहशतवादी राष्ट्र बनण्याचा विकृत आनंद लुटणाऱ्या रशियाकडून शांततेच्या दिशेने पावले पडण्याची वाट पाहणे मूर्खपणाचेच ठरेल. ‘क्रेमलिन’ अजूनही रशियात विषपेरणी करत आहेच. आंतरराष्ट्रीय कायदेशीर तरतुदीनुसार रशियावर निर्बंध लादण्याचे सर्वाचे सामूहिक कर्तव्य आहे.