वृद्ध व्यक्तींची काळजी घेण्यात स्वीडन हा सर्वात चांगला तर अफगाणिस्तान हा सर्वात वाईट देश आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अभ्यास अहवालात म्हटले आहे. वृद्धांची संख्या वाढत असून त्यांची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. अशी काळजी नेमकी कुठल्या देशांमध्ये चांगल्या प्रकारे घेतली जाते याचा अभ्यास यात केला आहे. या पाहणीत असे दिसून आले, की ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यात भारताचा क्रमांक खूपच खाली म्हणजे ७३ वा आहे.
‘ग्लोबल एज वॉच इंडेक्स’ या संस्थेने अशा प्रकारे वृद्धांची काळजी घेतली जाण्यासाठीच्या सुसज्जतेबाबत प्रथमच पाहणी केली असून त्यात स्वीडन हा देश वृद्धांच्या कल्याणाची काळजी वाहण्यात पहिल्या क्रमांकावर आला आहे. त्यानंतर नॉर्वे व जर्मनी या देशात वृद्धांची काळजी व वृद्धांसमोर असलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठीची सुसज्जता जास्त चांगली आहे.
ज्येष्ठ नागरिकांची काळजी हा आगामी काळात फार महत्त्वाचा विषय ठरणार असून सध्या साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची जगातील संख्या ८०.९ कोटी आहे ती २०५० पर्यंत २ अब्ज होईल. त्या वेळी पृथ्वीवरील दर पाच लोकांपैकी एक जण हा ज्येष्ठ नागरिक म्हणजे साठ किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील असेल, असे या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. एकविसाव्या शतकात लोकसंख्येतील वृद्धांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्यांची सर्व प्रकारची काळजी घेणे हा एक अग्रक्रमाचा विषय आहे. ज्येष्ठ, वृद्ध व निवृत्त लोकांसाठी आफ्रिका व दक्षिण आशियातील अनेक देश हे वास्तव्याच्या दृष्टीने वाईट आहेत कारण तेथे त्यांची काळजी फार चांगल्या प्रकारे घेतली जात नाही. टांझानिया, पाकिस्तान व अफगाणिस्तान यांचे क्रमांक वृद्ध, ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यात सर्वात तळाशी आहेत. वृद्ध नागरिक व त्यांची काळजी याविषयीचे निकष ‘हेल्पेज इंटरनॅशनल अॅडव्होकसी ग्रुप’ व संयुक्त राष्ट्रांचा लोकसंख्या निधी यांनी तयार केले व त्या आधारे निर्देशांकही ठरवण्यात आले. सामाजिक व आर्थिक निकषावर जागतिक आरोग्य संघटना व इतर जागतिक संस्थांनी ९१ देशांबाबत गोळा केलेल्या माहितीची तुलना हा अहवाल तयार करताना विचारात घेतली आहे. अमेरिका, जपान या देशात वृद्धांची काळजी जास्त चांगल्या प्रकारे घेतली जाते असा समज असला, तरी कमी उत्पन्न गटातील अनेक देशांनी त्यांच्या ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी चांगल्या योजना राबवल्याचे दिसून आले आहे. बोलिव्हिया हा जगातील एक गरीब देश असूनही त्या देशाने तसेच श्रीलंकेनेही चांगली कामगिरी केली आहेत. ब्राझील व चीन या उदयोन्मुख मोठय़ा अर्थव्यवस्था असलेल्या देशांचे क्रमांक अनुक्रमे ३१ व ३५ असे लागले आहेत. दक्षिण आफ्रिका, भारत, रशिया यांचे क्रमांक खूप खाली म्हणजे अनुक्रमे ६५, ७३ व ७८ असे आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Oct 2013 रोजी प्रकाशित
वृद्धांची काळजी घेण्यात स्वीडन आघाडीवर
वृद्ध व्यक्तींची काळजी घेण्यात स्वीडन हा सर्वात चांगला तर अफगाणिस्तान हा सर्वात वाईट देश आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अभ्यास अहवालात म्हटले आहे.

First published on: 03-10-2013 at 12:59 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Un study ranks sweden top country for elderly care