काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना सुशिक्षित उमेदवारांना निवडणुकीत मत देण्याचं आवाहन करणाऱ्या एका शिक्षकाचा मुद्दा चर्चेत आला होता. या शिक्षकावर व संबंधित शिक्षण संस्थेवर यावरून टीका करण्यात आली होती. आता या संस्थेनं त्या शिक्षकालाच कामावरून काढून टाकलं आहे. यासंदर्भात शिक्षण संस्थेचे प्रमुख रोमन सैनी यांनी ट्वीट करून माहिती दिली असून अशा प्रकारे वैयक्तिक भूमिका विद्यार्थ्यांसमोर मांडणं चुकीचं असल्याचं त्यांनी या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.
नेमकं काय झालं?
Unacademy चे शिक्षण करण संगवान यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये करण संगवान आपल्या विद्यार्थ्यांना एका सुशिक्षित उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. तसेच, “अशा व्यक्तीला निवडून द्या ज्या व्यक्तीला गोष्टी समजत असतील. ती व्यक्ती फक्त नावं बदलण्यात इच्छुक नसेल”, असंही करण संगवान आपल्या ऑनलाईन वर्गात विद्यार्थ्यांना सांगताना दिसत आहेत.
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर करन संगवान यांच्यावर टीका करण्यात येऊ लागली. सोशल मीडियावरही त्यांच्यावर वैयक्तिक भूमिका विद्यार्थ्यांवर लादण्याचे आरोप करण्यात येऊ लागले. यावर १९ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता आपल्या यूट्यूब चॅनलवर सविस्कर भूमिका मांडण्याचं करण संगवान यांनी जाहीर केलं आहे. मात्र, त्यांच्यावर होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर अनअकॅडेमीनं त्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
“आम्ही एक शिक्षणाचं व्यासपीठ आहोत. चांगल्या दर्जाचं शिक्षण दिलं जावं ही आमची बांधिलकी आहे. यासाठी आमच्या सर्व शिक्षकांना आम्ही काही वागणुकीसंदर्भातले नियम घालून दिले आहेत. आमचे विद्यार्थीच आम्ही जे काही करतो त्याच्या केंद्रस्थानी असतात. वर्ग हे काही वैयक्तिक मतं मांडण्याचं ठिकाण नसतं. त्यामुळे विद्यार्थ्यांवर चुकीचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत नियमांचं उल्लंघन केल्याच्या कारणास्तव आम्हाला करण संगवान यांना कामावरून काढावं लागत आहे”, असं अनअकॅडेमीचे सहसंस्थापक रोमन सैनी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
अरविंद केजरीवाल यांची नाराजी
दरम्यान, या मुद्द्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. “सुशिक्षित उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन करणं गुन्हा आहे का? जर कुणी अशिक्षित असेल, तर वैयक्तिक पातळीवर मी त्या व्यक्तीचा सन्मानच करतो. पण लोकप्रतिनिधी अशिक्षित असू शकत नाहीत. हे विज्ञान व तंत्रज्ञानाचं युग आहे. २१व्या शतकातील आधुनिक भारत अशिक्षित लोकप्रतिनिधी घडवू शकत नाहीत”, असं ट्वीट अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.
“खरं बोलण्याची शिक्षा”
दरम्यान, राष्ट्रीय लोक दलाचे नेते प्रशांत कनोजिया यांनीही या प्रकाराचा निषेध केला आहे. “सत्य बोलण्यासाठी शिक्षा दिली जात आहे. करण संगवान म्हणाले सुशिक्षित लोकांना मत द्या आणि भाजपानं हे मान्य केलं की हा थेट मोदींवरच हल्ला आहे. याचा अर्थ भाजपाच्या लोकांनाही विश्वास आहे की मोदी अशिक्षित आहेत आणि नावं बदलण्याशिवाय ते काहीही करत नाहीत”, असं कनोजिया या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
विरोधी पक्षांमधील अनेक नेते करण संगवान यांच्या समर्थनार्थ मैदानाच उतरले आहेत.