तब्बल २७ वर्षे भारतीय सुरक्षा यंत्रणांना गुंगारा दिल्यानंतर कुख्यात गुंड छोटा राजनला शुक्रवारी सकाळी भारतात आणण्यात आले. सीबीआय अधिकाऱ्यांच्या समावेश असलेल्या विशेष पथकाच्या देखरेखीत राजनला इंडोनेशियाहून घेऊन येणारे विमान आज सकाळी दिल्ली विमानतळावर दाखल झाले. या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी ५.३० वाजता छोटा राजनला घेऊन येणारे हवाईदलाचे गल्फस्ट्रीम-३ हे विशेष विमान पालम विमानतळावर उतरले. यावेळी विमातळावर जमलेल्या प्रसारमाध्यमांना गुंगारा देत छोटा राजनला सीबीआयच्या मुख्यालयात नेण्यात आले. सध्या सीबीआयच्या मुख्यालयातील तुरूंगात राजनला ठेवण्यात आले आहे. थोड्याचवेळात एम्स रुग्णालयातील डॉक्टरांकडून राजनची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी इंडोनेशियातील बाली येथे स्थानिक पोलीसांकडून छोटा राजनला अटक करण्यात आली होती. त्यानंतर भारताकडून छोटा राजनच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू होते. ज्वालामुखीमुळे गेल्या दोन दिवसांपासून छोटा राजनला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या भारतीय पथकाला बालीमध्येच थांबावे लागले होते. अखेर गुरूवारी संध्याकाळी हे पथक राजनला घेऊन भारताकडे रवाना झाले होते. तत्पूर्वी राजनवर नोंदविण्यात आलेल्या सर्व गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्याचा निर्णय गुरूवारी घेण्यात आला होता. खून, खंडणी व अमली पदार्थांची तस्करी यांचे अनेक गुन्हे नावावर असलेला राजन २७ वर्षांपूर्वी देशातून पळून गेला होता. ५५ वर्षांच्या राजनला घेऊन एक विशेष विमान भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७.४५ वाजता बालीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रवाना झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.