पीटीआय, नवी दिल्ली
भारत-ब्रिटनदरम्यानच्या व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रातील परस्पर भागीदारीबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनचे किर स्टार्मर यांची मुंबईत गुरुवारी भेट घेणार आहेत. स्टार्मर बुधवारपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर स्टार्मर यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

भारत-ब्रिटन व्यापक आर्थिक आणि व्यापार कराराच्या अनुषंगाने उभय देशांदरम्यान जुलैमध्ये ‘व्हीजन २०३५’ हा दहा वर्षांचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यात ब्रिटिश संसदेने मंजुरी दिलेल्या ९० टक्के वस्तूंवरील आयात शुल्क रद्द करण्याच्या दृष्टीने धोरण आखण्याबाबत पावलं उचलण्यात येणार आहेत. त्याबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी स्टार्मर यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले होते. ब्रिटनच्या शिष्टमंडळात १०० उद्योजक, विद्यापीठांचे कुलगुरू आणि सांस्कृतिक क्षेत्रातील धुरीणांचा समावेश असेल. या भेटीनिमित्ताने उभय देशांच्या नौदलांचे कोकण किनारपट्टीवर संयुक्त संचलन आयोजित करण्यात आले आहे. पंतप्रधान स्टार्मर भारतानंतर चीनला भेट देणार आहेत.

जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित सहाव्या जागतिक फिनटेक परिषदेत दोन्ही पंतप्रधान मार्गदर्शन करणार आहेत. या महोत्सवात विविध क्षेत्रांतील ७५ देशांतील एक लाखांहून अधिक मान्यवर सहभागी होणार असून ही जगातील सर्वात मोठी आर्थिक तंत्रज्ञानविषयक परिषद ठरणार आहे.

जागतिक स्तरावर भारत ब्रिटनदरम्यानचे आर्थिक संबंध खूप प्रगतिशील असून विविध क्षेत्रांतील नवकल्पना, संधी आणि परस्पर ध्येयपूर्ती यासाठी परस्पर देशांमध्ये अधिकाधिक सहकार्य निर्माण करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. – रिचर्ड हील्ड, अध्यक्ष, ब्रिटन भारत बिझनेस कौन्सिल