उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री कार्यालयामध्ये या डॉक्टरांनी अपर मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांकडे आपला राजीनामा सोपवला आहे. डॉक्टरांच्या असोसिएशनचे सचीव डॉ. संजीव कुमार यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री कार्यालयावर गंभीर आरोप केले आहेत. येथील अधिकारी आम्हाला चोर आणि बावळट म्हणतात, असं कुमार म्हणालेत. तुम्ही लोक काम करत नाही. सतत लखनऊ आणि कानपूरला पळून जाता, असे टोमणेही आम्हाला सरकारी अधिकारी मारत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. अधिकाऱ्यांकडूनच आम्हाला सहकार्य मिळत नाही. त्यांना ग्रामीण भागांमध्ये लसीकरण करण्यात काडीचा रस नाहीय. मात्र ते आमच्यावर टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव टाकत असतात.
अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून उन्नावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाच डॉक्टर आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रातील ११ डॉक्टरांनी एकाच वेळी राजीनामा दिलाय. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना कुमार यांनी डॉक्टरांची बाजू मांडली. “गाव खेड्यांपासून सगळीकडेच आमच्या टीम काम करत आहेत. मात्र सरकारी पातळीवर त्याची चाचपणी करताना आम्ही काम करत नाही असं दाखवलं जात आहे. आम्ही कामचोर असल्याचं भासवलं जात आहे. जिल्हाधिकारी स्तरावर जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून आमच्या कामाची दखल घेतली जात नाही,” असं कुमार म्हणाले. तसेच पुढे बोलताना, “आमच्या टीम दुपारी १२ पासून फिल्डवर असतात. रुग्णांच्या चाचण्या करणं, त्यांना औषधं देणं असं सारं काम करतो. त्यानंतर चार वाजता फोन येतो की तुमच्या आजच्या कामाचा अहवाल सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या. त्यावेळी तिथून २०-३० किलोमीटर दूरवरुन डॉक्टरांना ड्राइव्ह करत उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर हजर रहावं लागतं. त्यांनी दिवसभरामध्ये काम केलं आहे हे सिद्ध करावं लागतं. आम्ही काम करत असलो तरी आम्हीच काहीच करत नाही असं अनेकदा बोलून दाखवलं जातं. आमच्या या वागणुकीमुळे करोनाचा संसर्ग नियंत्रणाबाहेर गेल्याचा दावा केला जातो,” असंही कुमार यांनी सांगितलं.
आम्ही लोकांना होम आयसोलेट करतोय. मात्र अनेकदा चुकीचा पत्ता, फोन नंबर दिल्याने रुग्णांचा शोध घेता येत नाही. त्याचा दोषही आम्हालाच दिला जात असल्याचा दावा कुमार यांनी केला. तर अन्य डॉक्टरांनी, मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी अनेकदा आमच्याशी बोलताना धमकीच्या स्वरुपात बोलतात. काम केलं नाही तर एफआयआर दाखल करु, तुरुंगात टाकू असं आम्हाला सांगितलं जात असल्याचा आरोप केलाय.
अपर मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी एवढ्या मोठ्याप्रमाणात डॉक्टरांनी राजीनामा दिल्याने करोना लसीकरणावर परिणाम होईल अशी शक्यता व्यक्त केलीय.