फेसबुकचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग तसंच इतर ४९ जणांविरोधात उत्तरप्रदेशात गुन्हा दाखल करण्यात आला. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्याविरोधात बदनामीकारक मजकूर आढळल्याच्या आरोपाखाली यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. मात्र नंतर पोलिसांनी चौकशीदरम्यान मार्क झुकरबर्गचं नाव या प्रकरणातून वगळल्याची माहिती हाती येत आहे.

उत्तरप्रदेशातल्या कनौज जिल्ह्यात न्यायालयाच्या आदेशानुसार ही केस नोंदवण्यात आली. सोमवारी मुख्य न्यायदंडाधिकारी धरमवीर सिंग यांनी कनौज पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. सरहती गावचे रहिवासी असणाऱ्या अमित कुमार यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. कुमार यांनी फेसबुकवरच्या एका पेजविरोधात तक्रार दिली आहे. ह्या पेजचं नाव ‘बुआ बबुआ’ असं असून हे पेज अखिलेश यांच्या प्रतिमेवर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कुमार यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बुआ बबुआ’ हा शब्द २०१९ च्या निवडणुकांच्या वेळी वापरला गेला होता, जेव्हा अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी युती केली होती. न्यायालयाच्या आदेशांनुसार, थटिया पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कुमार यांनी सांगितलं की त्यांनी याआधी २५ मे रोजी पोलिसांकडे तक्रार केली होती पण पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने त्यांनी न्यायालयाकडे धाव घेतली.