देशात विकास, सुशासनावर लक्ष देण्यासाठी आपल्याला जाती, मतपेटी आणि धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करणे आवश्यक असल्याचा सल्ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. जात, धर्मापलीकडे जाऊन देशाच्या विकासाबाबत सर्वांनी विचार करायला हवा, असेही ते म्हणाले. मीरत येथे स्वातंत्र्य सैनिकांच्या गौरव कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
जो समाज आपला इतिहास सुरक्षित ठेऊ शकत नाही. ते आपल्या भूगोलाचेही रक्षण करू शकत नाहीत, असेही ते म्हणाले. देशवासियांनी व राजकारण्यांनना देशात जर विकास आणि सुशासन आणायचे असेल तर त्यांनी जाती, मत आणि धर्माच्या बाहेर येऊन विचार करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

 

नुकताच राष्ट्रीय स्तरावर झालेल्या स्वच्छता सर्वेक्षणात उत्तर प्रदेशमधील फक्त एका शहराचा स्वच्छ शहरांच्या यादीत समावेश असून ५२ शहरांचा अस्वच्छ शहरांच्या यादीत समावेश झाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. हे चित्र बदलण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

राज्यभरात आम्ही अँटी-रोमिओ पथक तैनात केले आहेत. संपूर्ण राज्यात या पथकाकडून सक्त कारवाई केली जात आहे. हे पथक आपल्या मुली, बहिणी यांच्या सुरक्षिततेसाठी तैनात केल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, स्वच्छ भारत सर्वेक्षणातील यादीत उत्तर प्रदेश पिछाडीवर असल्याची बाब मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भलतीच जिव्हारी लागल्याचे दिसते. आदित्यनाथ यांनी शनिवारी स्वच्छ भारत अभियानात सहभाग घेऊन लखनऊतील रस्त्यांची सफाई केली होती. त्यांच्यासोबत राज्याचे अन्य मंत्रीही होते. सर्वाधिक अस्वच्छ जिल्ह्यांच्या पहिल्या पंधरामध्ये सर्वाधिक नऊ जिल्हे हे उत्तर प्रदेशातील आहेत. स्वच्छ सर्वेक्षणाची यादी जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी याबाबत चिंता व्यक्त केली होती. हे सर्वेक्षण भाजप आणि आम्ही सत्तेत येण्याआधी करण्यात आले होते. सर्व क्षेत्रांमध्ये जोरदार कामे केली जाणार असून, डिसेंबरअखेरीपर्यंत ३० जिल्ह्यांना हागणदारीमुक्त करण्यात येईल, असा निर्धार सरकारने केल्याचेही त्यांनी सांगितले.