UP Crime News : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी दरोडा, लैंगिक अत्याचार, हिंसा, गोळीबार, खून, जाळपोळ, हाणामारी अशा घटना दररोज घडत असल्याची माहिती समोर येते. आता उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात देखील एक धक्कादायक घटना घडली आहे.

उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपल्याच ३ महिन्यांच्या मुलाची आणि पत्नीची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ३ महिन्याच्या मुलाला आणि पत्नीला संपवल्यानंतर स्वत:ही जीवन संपवलं आहे. माहितीनुसार, शनिवारी एका खोलीत ३ महिन्यांच्या बाळासह एकाच कुटुंबातील तीन जण मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

दरम्यान, पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा तिघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करत मृतांची ओळख पटवली. जितेंद्र कुमार प्रजापती (२३), त्यांची पत्नी गौरा (२०) आणि त्यांचा मुलगा अशा तिघांचे मृतदेह असल्याची ओळख पटली. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये काम करणाऱ्या प्रजापतीने अटारा येथील त्यांच्या घरी स्वत:चं जीवन संपवण्यापूर्वी पत्नी आणि मुलाची हत्या केली. बुधवारी गुजरातहून परतलेल्या प्रजापतीने कौटुंबिक वादातून पत्नी गौरा हिचा गळा चिरल्याचा पोलिसांना संशय आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये या जोडप्याचं लग्न झालं होतं असं पोलिसांनी सांगितलं आहे.

बांदा पोलीस अधीक्षकांनी या घटनेबाबत सांगितलं की, “शवविच्छेदन तपासणी पूर्ण झाली आहे आणि आम्ही संपूर्ण अहवालाची वाट पाहत आहोत. अहवाल समोर आल्यानंतरच याा घटनेतील बाळाच्या मृत्यूचं कारण आणि पत्नी आणि पतीच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल”, असं त्यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ८ मे रोजी कुटुंबाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केलेली प्रजापतीची एक सुसाईड नोट पोलिसांना सापडली. त्यात त्याने त्याच्या सासरच्या लोकांवर गौराच्या धाकट्या बहिणीच्या बेपत्ता होण्यावरून खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन छळ केल्याचा आरोप केला होता. आता पोलीस याबाबत चौकशी करत असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.