MP Man Urinated On Adivasi Worker New Update: मध्य प्रदेशमधील आदिवासी मजुरावर लघवी केल्याचे प्रकरण बरेच चर्चेत होते. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संबंधित आरोपी प्रवेश शुक्ला याच्यावर तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते. इतकेच नाही तर त्यांनी पीडित व्यक्तीस आपल्या निवासस्थानी येण्याचे आमंत्रण देऊन त्याचे पाय धुऊन क्षमा मागितली होती. मात्र आता या सगळ्या प्रकरणाला वेगळाच ट्विस्ट आला आहे. शिवराज सिंह चौहान यांनी ज्या व्यक्तीचे पाय धुतले त्या दशमत रावत यांचा एक व्हिडीओ मध्य प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये दशमत रावत यांनी केलेला खुलासा या प्रकरणाला वेगळाच ट्विस्ट देणारा आहे.
मध्य प्रदेश काँग्रेसच्या अकाउंटवर शेअर केलेल्या ट्वीट मध्ये लिहिले होते की, “शिवराज सिंह यांनी लघवी केलेल्या व्यक्तीचे नव्हे तर दुसऱ्याचे पाय धुण्याचे नाटक केले होते, एवढं मोठं षडयंत्र. मध्य प्रदेश तुम्हाला माफ करणार नाही.” याच ट्वीटमधील व्हिडिओमध्ये दशमत रावत यांनी सुद्धा त्यादवशी नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे. ते सांगतात, “मी बाजारातून येत असताना एकीकडे बसलो होतो, तिथे प्रवेश शुक्ला आला होता. त्याला मी पाहिलेही नव्हते मग जेव्हा दीनदयाळ साहूने हा व्हिडीओ व्हायरल केला तेव्हा सगळे मला विचारायला लागले पण या व्हिडिओमध्ये जी व्यक्ती आहे ती मी नाही. मी पोलिसांना सुद्धा हेच सांगितलं. मी स्वतः व्हिडीओ पहिला आहे आणि त्यातील व्यक्ती मी नाही.”
दुसरीकडे, सिधीचे एसपी डॉ. रवींद्र वर्मा यांनी या दाव्याचं खंडन केलं आहे. “सिधी लघवी प्रकरणाच्या व्हायरल व्हिडिओच्या बाबतीत, पीडित व्यक्ती दशमत रावत नव्हती असे काही दिशाभूल करणारे दावे आहेत. पोलिस तपासात तो माणूस दशमत रावत असल्याची पुष्टी झाली,” असे एसपी म्हणाले.
दरम्यान, सिधीचे जिल्हाधिकारी साकेत मालवीय यांनीही व्हिडिओमध्ये सदर व्यक्ती दशमत रावतच असल्याची पुष्टी केली आहे. विशेष म्हणजे सध्या दशमत रावत ज्या दीनदयाळ साहूचे नाव घेत आहेत हेच नाव काही दिवसांपूर्वी रमाकांत शुक्ला म्हणजेच आरोपी प्रवेश शुक्ला यांच्या वडिलांनी सुद्धा संशयित म्हणून सांगितले होते.
सिधी लघवी प्रकरण : काय आहे नवा वाद?
- मध्य प्रदेशातील एका आदिवासी व्यक्तीवर प्रवेश शुक्ला नामक व्यक्तीने लघवी केल्याचा व्हिडिओ गेल्या आठवड्यात व्हायरल झाला होता.
- प्रवेश शुक्लाला अटक करण्यात आली आणि राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. शिवराज सिंह चौहान यांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते ज्यानंतर आरोपीचे अनधिकृत घर पाडण्यात आले.
- मुख्यमंत्र्यांनी दशमत रावत या पीडित व्यक्तीची भेट घेतली आणि क्षमा मागून त्याचे पाय धुतले.
- शिवराज सिंह चौहान यांनी दशमत रावत यांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. रावत यांनी प्रवेश शुक्ला यांच्या सुटकेची मागणी केली आहे.
- दुसरीकडे प्रवेश शुक्लाच्या वडिलांनी हा व्हिडीओ खोटा असून आम्हाला त्रास देण्यासाठी व्हायरल करण्यात आल्याचे सुद्धा एका व्हिडिओमध्ये सांगितले होते.