साडेचार वर्षाच्या कालावधीत भाजपाने जनतेला दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाहीत. तर त्यांनी केवळ संघाचा अजेंडा राबविला आहे. त्यामुळे एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असे बिहारचे राष्ट्रीय लोक समता पार्टीचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनी सांगितले. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, भाजप सरकारमध्ये मंत्रिमंडळात असताना कोणत्याही विषयावर चर्चा न करता पंतप्रधान कार्यालयातून निर्णय घेतले गेले आहेत. त्यामुळे आम्ही सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
भविष्यात आपल्या पक्षासमोर असलेले पर्यायही कुशवाह यांनी त्यावेळी सांगितले. ते म्हणाले, आगामी निवडणूकीत आमच्याजवळ तीन पर्याय आहेत. एक म्हणजे स्वतंत्रपणे लढणे, दुसरा महाआघाडीत जाणे, तर तिसरा आघाडीत जाणे. योग्य वेळ येईल तेव्हा याबाबत निर्णय घेऊ असेही त्यांनी सांगितले. भाजपाला सोडचिठ्ठी देताना नुकताच त्यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाचाही राजीनामा दिला होता. त्यांचे हे राजकीय पाऊल ४० लोकसभा जागा असलेल्या बिहारमध्ये महत्त्वाचे ठरुन येथील राजकीय समीकरणे बदलू शकतात.