UPSC Aspirant Died by Suicide : महाराष्ट्रातील पूजा खेडकर प्रकरण, दिल्लीतील कोचिंग सेंटरमध्ये साचलेल्या पावसात तीन विद्यार्थ्यांचा झालेला मृत्यू आणि एका विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने झालेला मृत्यू आदी कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय नागरी लोकसेवा परीक्षेबाबत चर्चा सुरू आहे. आता अकोल्यातील एका युपीएससीच्या विद्यार्थिनीने दिल्लीत आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर येत आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. परीक्षा आणि खर्चाला कंटाळून तिने शनिवारी आत्महत्या केल्याचं चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे.

अंजली असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती दिल्लीच्या जुन्या राजिंदर नगरमध्ये नागरी सेवा परीक्षेची (UPSC) तयारी करत होती. तिने हॉस्टेलच्या रुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या सुसाईड नोटमध्ये, तिने सरकारला ‘सरकारी परीक्षांमधील घोटाळे कमी करा’ आणि ‘रोजगार निर्माण’ करण्याचे आवाहन केले. तसंच, वाढलेल्या घराच्या भाड्यामुळेही तणावात होती असं या चिठ्ठीतून स्पष्ट होत आहे.

“आई-बाबा मला माफ करा. मी आता आयुष्याला कंटाळले आहे. माझ्यासमोर फक्त समस्या आणि समस्याच आहेत. मला आता शांततेची गरज आहे. या नैराश्येतून मुक्त होण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. पण मी नैराश्येतून मुक्त होऊ शकले नाही. त्यावर मात करू शकले नाही”, असं अंजलीने (UPSC) तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

हेही वाचा >> स्पर्धा परीक्षेतून हताश आणि निराश झालेला तरुण म्हणून बाहेर पडण्याऐवजी प्रॅक्टिकल निर्णय घ्या

वसितगृहचालक विद्यार्थ्यांना लुटत आहेत

“पहिल्याच प्रयत्नात युपीएससी (UPSC) परीक्षा पास व्हावी असं माझं स्वप्न होतं. पण मी किती चंचल आहे ते सर्वांना माहितेय. कृपया सरकारी परीक्षांमधील घोटाळे कमी करा आणि रोजगार निर्माण करा. नोकरीसाठी अनेक तरुण धडपडत आहेत”, असंही तिने पुढे पत्रात म्हटलंय. अंजलीच्या सुसाईड नोटमध्ये पेइंग गेस्ट सुविधा आणि हॉस्टेलच्या महागड्या खर्चाचाही उल्लेख आहे. मृत्यूपूर्वी तिने श्वेता नावाच्या मैत्रिणीशी पीजीच्या वाढत्या भाड्याबाबतही चर्चा केली होती. “पीजी आणि वसतिगृहाचे भाडेही कमी केले पाहिजे. हे लोक विद्यार्थ्यांकडून फक्त पैसे लुटत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला ते परवडणारे नाही”, असं तिने पत्रात म्हटलं. अंजली एका खोलीसाठी १५ हजार रुपये द्यायची. परंतु, आता हे भाडं वाढून १८ हजार रुपये करण्यात आलं होतं, अशी तिची मैत्रिण श्वेताने इंडिया टुडे टीव्हीला सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही पर्यायी मार्ग शोधत होतो

पीडितेच्या आईने इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, आम्ही तिच्यावर खर्च करत असलेल्या पैशांची तिला काळजी होती. परंतु, आम्ही तिला काळजी करू नकोस असं सांगितलं होतं. यातूनही पर्याय शोधण्याचा आमचा प्रयत्न सुरू होता. परंतु, तिने कोणताही विचार न करता टोकाचा निर्णय घेतला.” याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.