टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद ही कायमच तिच्या कपड्यांमुळे चर्चेत आणि प्रसंगी वादातही असते. तिच्या कपडे परिधान करण्याच्या पद्धतीवरून अनेकदा प्रश्नउपस्थित केले जातात. सोशल मीडियावरही उर्फी जावेदला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जातं. मात्र, आता राहुल गांधींना ट्रोल करण्यासाठी उर्फी जावेदच्या नावाचा वापर भाजपाकडून करण्यात आला आहे. राहुल गांधी टी-शर्टवर दिल्लीच्या थंडीत यात्रेमध्ये फिरत असल्याचा मुद्दा सध्या चर्चेचा ठरला आहे. त्यावरून राहुल गांधींना लक्ष्य करण्यासाठी गुजरातमधील एका भाजपा कार्यकर्त्याने केलेल्या ट्वीटवर उर्फी मात्र चांगलीच भडकली. या ट्वीटवर तिनं आक्रमक शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं. तसेच, आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनही स्क्रीनशॉट शेअर करत संताप व्यक्त केला.

नेमकं घडलं काय?

राहुल गांधी सध्या दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीतही टी-शर्टवर यात्रेमध्ये फिरत आहेत. त्यामुळे ‘राहुल गांधींना थंडी वाजत नाही का?’ असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. भाजपाकडूनही याचं भांडवल करत खोचक टोलेबाजी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिनेश देसाई नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधींवर उपहासात्मक ट्वीट करण्यात आलं आहे. हे ट्विटर अकाऊंट व्हेरिफाईड असून त्यावर भाजपा कार्यकर्ता, मालधारी सेना गुजरात असंही लिहिण्यात आलं आहे.

काय आहे या ट्वीटमध्ये?

दिनेश देसाई यांच्या ट्वीटमध्ये राहुल गांधींची तुलना उर्फी जावेदशी करण्यात आली आहे. “जर थंडीमध्ये फक्त एक टीशर्ट घातल्यामुळे राहुल गांधी भारताचे पंतप्रधान होण्यासाठी पात्र होणार असतील, तर मग उर्फी जावेद तर अमेरिकेची राष्ट्रपतीच असायला हवी”, असं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा – अंगभर कपडे परिधान केल्यामुळे उर्फी जावेदच्या त्वचेवर अ‍ॅलर्जी, अभिनेत्रीचं कारण ऐकून चित्रा वाघ संतापल्या, म्हणाल्या, “गोळ्या देऊन…”

दरम्यान, हे ट्वीट व्हायरल झाल्यानंतर उर्फी जावेद त्यावर चांगलीच भडकली आहे. उर्फीनं या ट्वीटवर रिप्लाय करताना संबंधित व्यक्तीला सुनावलं आहे. “राहुल गांधींचं माहिती नाही, पण मी तुमच्यापेक्षा तरी नक्कीच चांगली राजकीय व्यक्ती होऊ शकते. माझ्या राज्यात एकाही महिलेचा तिच्या कपड्यांवरून अपमान केला जाणार नाही. तुमचा मुद्दा मांडण्यासाठी एका महिलेचा अपमान करणं अशा प्रकारचं राजकारण तुम्हाला करायचं आहे का?” असं ट्वीट उर्फी जावेदनं केलं आहे.

दरम्यान, आपल्या इन्स्टाग्रामवरही उर्फीनं या संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर करत गुजरात भाजपाला टॅग करून संताप व्यक्त केला आहे. “हे तुमचे राजकारणी आहेत का? काहीतरी चांगलं करा! अशा लोकांकडून महिलांना सुरक्षा पुरवण्याची अपेक्षा कसी करू शकतो आपण?” असा सवालच उर्फीनं विचारला आहे.

आणखी वाचा – उर्फी जावेद…बाई अंगभर नाही पण निदान शोभतील असे कपडे घाल!

URFI JAVED TWEET
उर्फी जावेदनं पोस्ट केलेली इन्स्टाग्राम स्टोरी!

दरम्यान, ट्विटरवर या व्यक्तीने उर्फीच्या ट्वीटवरही प्रत्युत्तर दिलं आहे. “भारताची संस्कृती किंवा महिलांचा सन्मान याच्याशी संबंधित महिलेचा काहीही संबंध नाही. आमच्यासाठी झाशीची राणी लक्ष्मीबाई प्रेरणास्रोत आहेत. तुमचे सोशल मीडिया फोटो आणि व्हिडीओ नाही”, असं ट्वीट दिनेश देसाई या व्यक्तीने केलं आहे.

दरम्यान, उर्फी जावेद आणि या व्यक्तीमध्ये झालेलं संभाषण आता चर्चेचा विषय ठरलं आहे.