दुसऱ्यांदा फ्रान्सच्या अध्यक्षपदाची सूत्रे

एपी, पॅरिस : फ्रान्सच्या अध्यक्षपदाची सूत्रे इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शनिवारी पुन्हा हाती घेतली. हे त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीचे दुसरे पर्व आहे. फ्रान्ससह युरोपचे जागतिक स्तरावर आणखी चांगले नाव व्हावे, यावर आपला भर राहील. त्याआधी युक्रेन-रशिया युद्ध अधिक चिघळू नये म्हणून आपण तातडीने हालचाली करू, असा संकल्प मॅक्रॉन यांनी जाहीर केला.  

२४ एप्रिल रोजी मॅक्रॉन यांची पाच वर्षांसाठी फ्रान्सच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे. त्यांनी कडव्या उजव्या विचारसरणीच्या प्रतिस्पर्धी मरीन ली पेन यांचा पराभव केला होता. अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा हाती घेताना त्यांनी सांगितले, की फ्रान्स आणि युरोपसाठी ठोस कृती करण्याचा काळ आता आला आहे. मात्र, त्याआधी रशियाचे युक्रेनवरील आक्रमण आता रोखावे लागेल. समृद्धीसाठी फ्रान्सला अधिक स्वावलंबी सार्वभौम देश बनवण्यावर आपला भर असून, आगामी शतकाच्या आव्हानांना सक्षमरित्या तोंड देण्यासाठी फ्रान्ससह युरोपची बांधणी करण्याचीही गरज आहे.   

एरवी सविस्तर भाषण करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मॅक्रॉन यांनी अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा हाती घेताना संक्षिप्त आणि लिखित भाषण वाचले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना हस्तांदोलन, अभिवादन केले. पाहुण्यांशी संवाद साधला. या सोहळय़ावर करोनाचा परिणाम दिसला नाही. सध्या फ्रान्समध्ये सर्व कोविड प्रतिबंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे सामाजिक अंतर नसल्याने सोहळय़ात उत्साह जाणवत होता. या सोहळय़ास ५०० पाहुण्यांना निमंत्रित केले होते. त्यात राजकीय क्षेत्रांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील जाणकारांसह संस्था, संघटना, कामगार संघटनांच्या सहकार्याने संसद आणि सरकारचे कामकाज एकजुटीने चालावे. त्यामुळे सामाजिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते. त्यासाठी प्रशासनाची चांगली कार्यपद्धती शोधून राबवली जाईल.

-इमॅन्युएल मॅक्रॉन, फ्रान्सचे अध्यक्ष